संसदेने जनलोकपाल विधेयक मंजूर करावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत नव्याने आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.
डिसेंबर महिन्यात रामलीला मैदानावर जनलोकपाल विधेयकासाठी उपोषण सुरू करण्यात येणार असून या वेळी ‘जनलोकपाल आणा अथवा चालते व्हा’ अशी घोषणा देण्यात येणार असल्याचे हजारे यांनी सांगितले. अण्णा हजारे यांची जनतंत्र यात्रा बरेली येथे आली असता त्यांनी ही माहिती दिली.
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे नामकरण जनतंत्र मोर्चा असे करण्यात येणार आहे. उमेदवाराचे चारित्र्य कसे आहे त्यावर नव्हे तर त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ किती आहे त्यावर राजकीय पक्ष उमेदवारी देतात. त्यामुळेच १६३ खासदार आणि १५ आमदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे उघडकीस आले आहे, असेही ते म्हणाले.
राजकीय पक्ष ज्या उमेदवारांना उमेदवारी देतात त्यांना आपण मते देतो हाच आपला दोष असून त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांना मत देणार नाही, असा आपण निर्णय घेण्याची गरज आहे. असे झाले तरच खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होईल, असेही ते म्हणाले.
जनलोकपाल विधेयकासाठीच केवळ आपला लढा नाही तर खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी आपला लढा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा