भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्या उपस्थितीत रविवारी अमेरिकेमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
अमेरिकेत स्थायीक झालेले सुमारे दोन लाख भारतीय नागरिक या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या संचलनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात तिरंगा राष्ट्रध्वज असल्यामुळे मॅनहॅटनचा परिसर भारतमय होऊन गेला होता. भारतीय संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेचे दर्शन या कार्यक्रमात उपस्थितांना दिसले. संचलनात सहभागी झालेल्यांकडून अण्णा हजारे झिंदाबाद… भ्रष्टाचार दूर करा… अशा घोषणा देण्यात येत होत्या. देशातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आम्ही तुमच्यासोबत असे आश्वासन उपस्थितांनी अण्णा हजारे यांना यावेळी दिले.
संचलनात सहभागी झालेल्या अनेकांनी केशरी, हिरवा आणि पांढऱया रंगाचे कपडे घातल होते. गांधी टोपीवर आय एम फॉर अण्णा असेही लिहिण्यात आले होते. संचलनामध्ये सहभागी झालेले भारतीय नागरिक पाहून विद्या बालन भारावून गेली. इतका सुंदर सोहळा मी याआधी कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया विद्या बालन हिने व्यक्त केली.