‘जनतंत्र’ यात्रेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणारे आणि जनजागृती करणारे समाजसेवक अण्णा हजारे आता एका वेगळ्याच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशमधील जौनपूर येथील स्थानिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने पोलिसांना अण्णा हजारेंच्या विरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
जौनपूर येथील स्थानिक वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी अण्णा हजारेंच्या विरोधात याचिका दाखल केली होती. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, अण्णा हजारे आपल्या ‘जनतंत्र यात्रे’ दरम्यान, जौनपूर येथील एका महाविद्यालयात होणाऱया सभेला राष्ट्रध्वजाच्या रंगाने रंगविलेल्या गाडीतून आले. ही सभा रात्री आठ वाजेपर्यंत चालू होती. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे.
नियमांनुसार सुर्योदय ते सुर्यास्तच्या दरम्यान राष्ट्रध्वज उभारावा. सुर्यास्तानंतरही राष्ट्रध्वज तसाच ठेवणे ध्वजाचा अपमान केल्यासारखे आहे.