संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकपाल विधेयक संमत करून घेतले जाईल, असे आश्वासन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहे. परंतु याआधीही गेली दोन वर्षे अशी आश्वासने देण्यात आली तरी त्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांचे इरादे एकूणच नेक दिसत नाहीत, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे व्यक्त
केले.
अशी आश्वासने आणि अनेक पत्रे गेली दोन वर्षे आपल्याला सातत्याने मिळत आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आपल्याला अलीकडेच असे पत्र लिहिले आहे. परंतु त्यासंदर्भात पुढे काय, अशी विचारणा करून ‘त्यांचे इरादे स्पष्ट होत नाहीत, ते पुन्हा लोकांची फसवणूक करीत आहेत. ते तेवढेच प्रामाणिक असते तर त्यांना हे विधेयक याआधीही एक किंवा दोन संसदीय अधिवेशनांमध्येच संमत करू शकले असते, अशी टीका अण्णांनी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून तुम्हाला या विधेयकाबद्दल काही आशा आहे काय, असे विचारले असता हे सगळेजण सारखेच असून ते लोकांना फसवित आहेत, अशी तोफ अण्णांनी डागली.
लोकनायक जयप्रकाश नारायण आणि महात्मा गांधी यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्याच्या हेतूने एकूणच व्यवस्थेत बदल व्हावा, म्हणून आपण आंदोलनात उतरत असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.