भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारला धारेवर धरणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनलोकपाल विधेयक आंदोलनासाठी पुन्हा सज्ज झाले असून २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विधेयक मंजूर न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’साठी आपली लढाई सुरूच राहील याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी येथे झाले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अण्णांनी उपोषणाचा इशारा दिला. यापूर्वी त्यांनी आपण यापुढे कोणतेही उपोषण आंदोलन करणार नसल्याची प्रतिज्ञा केली होती. मात्र, जनलोकपालच्या मुद्दय़ावरून पंतप्रधानांनी आपली फसवणूक केली आहे, त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केलेले नाही, त्यामुळे प्रतिज्ञा मोडून रामलीला मैदानावर उपोषण करणे भाग पडेल असे अण्णा म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने जनलोकपाल विधेयकाला मंजुरी दिली नाही तर रामलीला मैदानावर उपोषणाला बसण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, देशात अनेक नेते आहेत. मात्र, नेतेमंडळी भ्रष्टाचारात बरबटलेली आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सामान्यांनीच लढा द्यायला हवा. त्यामुळेच आपण हे आंदोलन सुरू केले असल्याचे अण्णा म्हणाले. केजरीवाल यांनी स्वतंत्र वाट चोखाळली असली तरी त्यांचे आणि आमचे ध्येय एकच असल्याचेही अण्णांनी स्पष्ट केले.
उपोषणाचे शस्त्र अण्णा पुन्हा उपसणार
भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारला धारेवर धरणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनलोकपाल विधेयक आंदोलनासाठी पुन्हा सज्ज झाले असून २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विधेयक मंजूर न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
First published on: 12-11-2012 at 02:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna will use his fast as weapon again