विदेशी गुंतवणूक आणि भूसंपादन विधेयकांसारख्या मुद्यांवर भ्रष्टाचारविरोधातील लढ्याचे नेतृत्व करणा-या अण्णा हजारेंच्या मताशी आपण सहमत असल्याचे कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात देशातील महत्वपूर्ण प्रश्नांसंदर्भात अण्णांनी ममता बॅनर्जींना पत्र लिहून आपली भूमिका कळवली असल्याची माहिती तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मुकूल रॉय यांनी दिली. या पत्राला उत्तर देताना ममता बॅनर्जींनी विदेशी गुंतवणूक, आर्थिक योजना, भूसंपादन आणि सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण आदी मुद्यांबाबतच्या अण्णांच्या भूमिकेला आपली सहमती दर्शविली होती. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकायुक्तांची नियुक्ती तसेच राज्यसरकारच्या कर्मचा-यांना लोकपालच्या कक्षेत आणणे यासारख्या अण्णा हजारेंच्या सुचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र, अण्णांनी तृणमूल पक्षाला लिहलेल्या पत्रासंदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी यांनी सांगितले आहे.