२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए आघाडीने ४०० पारचा नारा दिला होता. त्यांनी ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. अब की बार ४०० पार म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारांचा धडका लावला होता. परंतु, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर त्यांनी ३०० ची संख्याही पार केली नसल्याचं समोर आलं आहे. तर, काही राज्यांत त्यांना सपाटून मार खावा लागला आहे. ४०० पारचा नारा दिल्याने काही राज्यांत अपयश आल्याचं नेत्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील नेत्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असंच वक्तव्य केलं. या वक्तव्याचं जदयूचे नेते के.सी त्यागी यांनीही समर्थन दिलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
“गेल्या १० वर्षांत मोदींनी काम केलंय. त्यांचं १० वर्षांतलं काम आम्ही पाहिलं आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आम्ही पाहिले आहेत. गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते त्यांनी गेल्या १० वर्षांत घेतले. परंतु, त्यामुळे काय झालं, नरेटिव्ह सेट करताना काही ठिकाणी आम्हाला नुकसान झालं. महाराष्ट्रातही नुकसान झालं. संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा चर्चा होत्या. असं काहीच होणार नव्हतं. परंतु, ४०० पारच्या आकड्यामुळे गडबड झाली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >> “४०० पारच्या घोषणेमुळे…”, महाराष्ट्रातील अपयशाबद्दल एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले…
के. सी त्यागी काय म्हणाले?
४०० पारच्या घोषणेचा संबंध विरोधकांनी संविधान बदलणार असल्याची जोडला आणि त्याचा निवडणुकीत दुरुपयोग करून घेतला”, असं के. सी त्यागी म्हणाले.
#WATCH | On Maharashtra CM Eknath Shinde's statement, JDU leader KC Tyagi says, "400 paar slogan raised by us was grossly misused by the opposition parties by associating it with changing the constitution." pic.twitter.com/SLIaesRYqD
— ANI (@ANI) June 12, 2024
एनडीएचं स्वप्न भंगलं
लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार, भारतीय जनता पक्षाला २४० जागा, जनता दलाने १२ जागा, टीडीपीने १६ जागा, शिंदे गटाने ७, अजित पवार गटाने १ आणि इतर लहान-मोठ्या घटक पक्षांनी १ किंवा २ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एनडीएचं ४०० पारचं स्वप्न यंदाच्या निवडणुकीत तरी भंगलं आहे.
इंडिया आघाडीला किती जागा?
इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या असून महाराष्ट्रातील अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही त्यांना समर्थन दिलं आहे. म्हणजे काँग्रेसच्या एकूण १०० जागा झाल्या आहेत. तर, आपला ३ जागा, ठाकरे गटाला ९, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८ आणि काँग्रेसला १३ जागा मिळाल्या आहेत.