नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर १४ वा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणूकपूर्व आढावा घेतला असून सोमवार ते बुधवार (११ ते १३ मार्च) या तीन दिवसांत तीनही निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देतील.
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जम्मू व काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण माहिती पुरवलेली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांचा आढावा घेईल. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला आढावा घेण्याचे आदेश दिले होते. आयोगाला ३० सप्टेंपर्यंत विधानसभेची निवडणूक घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचीही तयारी केली जात असल्याचे समजते. दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात आयोगाने अजून निर्णय घेतलेला नाही. मात्र, येत्या आठवडय़ातील आयोगाच्या भेटीमध्ये दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याइतके अनुकूल वातावरण आहे का, याची चाचपणी केली जाणार आहे.
हेही वाचा >>>नोटा’चा पर्याय हा दंतहीन वाघ! नकाराच्या अधिकाराशिवाय अर्थ नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा दौरा हा राज्यांचा अखेरचा दौरा असेल. आयोगाने उत्तर प्रदेश तसेच, पश्चिम बंगालचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरहून दिल्लीत परतल्यानंतर आयोग तातडीने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करेल असे समजते.
अंदाज काय?
’लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याक्षणी आचारसंहिता लागू होते. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना १२ राज्यांचे झंझावाती दौरे पूर्ण करावे लागतील.
’१३ मार्च हा मोदींच्या निवडणूकपूर्व दौऱ्याचाही अखेरचा दिवस असेल. त्यापूर्वी ११ वा १२ मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही होण्याची शक्यता.
’या बैठकीमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची अपेक्षा असून विविध मंत्रालयांनी याआधीच विविध योजना जाहीर केल्या आहेत.