राजस्थान दौऱ्यावर असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्कूटरवर येऊन अण्णा हजारे मुक्कामी थांबलेल्या ठिकाणी हे पत्र शनिवारी टाकले. या धमकीनंतर अण्णांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आज सीकरमधील सभेने अण्णा आंदोलनाची हाक देणार होते. मात्र, त्याआधी धमकीपत्र मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, हे पत्र मिळाल्याबरोबरच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तुम्ही येथे येऊन चांगले केले नाही असे या पत्रात म्हटले आहे. अण्णांचे सीकरमध्ये येणे अशुभाचं लक्षण असून, त्यांना पुन्हा इथे बोलावल्यास गोळ्या झाडून ठार मारू, असे पत्रात लिहलेले आहे. या पत्राची चौकशी करण्यात येत आहे असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश कुमार यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे सध्या राजस्थानमधल्या सिकरच्या दौ-यावर आहेत. अण्णा हजारे यांनी काँग्रेससोबतच भाजपवरही यावेळी हल्लाबोल केला आहे. तसेच गोमांसच्या मुद्दावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.