काही दिवसांपूर्वी कानपूरमधील शिवराजपुरा भागात रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेऊन कालिंदी एक्सप्रेस खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. मात्र, आता कानपूरमध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे. कानपूर सेंट्रलजवळ असलेल्या प्रेमपूर रेल्वे स्थानकापासून काही मीटर अंतरावर रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर आढळून आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या एका महिन्याभरातली ही पाचवी घटना आहे. त्यामुळे रेल्वेचे अपघात घडवून आणण्यासाठी कट रचला जातो आहे का? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूर सेंट्रल आणि फत्तेपूरदरम्यान प्रेमपूर हे छोटेसे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकापासून काही मीटर दूर रेल्वे रुळावर सिलिंडर आढळून आलं आहे. आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास या रुळावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाच्या ही बाब लक्षात आली. यावेळी त्याने आपातकालीन ब्रेक लावले. त्यामुळे मालगाडीचा अपघात टळला.

हेही वाचा – कालिंदी एक्सप्रेसचा अपघात घडवून आणण्याचा कट? कानपूरमध्ये रेल्वे रुळावर सापडला गॅस सिलिंडर, थोडक्यात अनर्थ टळला

या घटनेची माहिती मालगाडीच्या चालकाने रेल्वेच्या गार्डला, तसेच स्टेशन मास्टर आणि रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता, त्यांना रुळावर लाल रंगाचे ५ लिटरचे खाली सिलिंडर आढळून आले. यासंदर्भात बोलताना, अशा प्रकारचे सिलिंडर घरघुती वापरात किंवा मुलांच्या वसतीगृहात वापरले जातात. हे सिलिंडर आम्ही जप्त केले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. अशी माहिती जीआरपीचे एसएचओ ओम नारायण सिंह यांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. १० सप्टेंबर रोजी रेल्वे रुळावरून गॅस सिलिंडर ठेऊन कालिंदी एक्सप्रेस रुळावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही एक्सप्रेस भिवानीवरून प्रयागराजच्या दिशेन जात होती. यादरम्यान, एक्सप्रेस शिवराजपुरा भागात येताच रेल्वे रुळावर सिलिंडर असल्याचे लोको पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळे चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबले. पण त्यापूर्वीच एक्सप्रेसने सिलिंडरला धडक दिली होती. त्यामुळे सिलिंडर रेल्वे रुळाच्या बाजुला जाऊन पडले आणि मोठा अनर्थ टळला होता.

हेही वाचा – Durg News : दोन मित्र रेल्वे रुळावर बसून मोबाईलवर खेळत होते व्हिडीओ गेम; ट्रेन आली अन् घडली धक्कादायक घटना

याशिवाय १६ ऑगस्ट रोजी कानपूर झांसी मार्गावरही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून खाली घसरले होते. या घटनेत काही जण जखमी झाले होते. या घटनेच्या एका आठवड्यानंतर २३ ऑगस्ट रोज कांसगंज रेल्वेमार्गावरही लाकडं ठेवण्यात आली होती. तेव्हाही मोठी दुर्घटना टळली होती. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. दोघांनी दारुच्या नशेत रेल्वे रुळावर लाकडं ठेवल्याचे कबूल केलं होतं. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी पहाटे कानपूरमध्ये रेल्वे रुळावर लाकडं ठेवण्यात आली होते. त्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेसला बराच काळ थांबवून ठेवण्यात आलं होतं. १८ सप्टेंबर रोजीही गाझीपूर घाट आणि गाझीपूर सिटी रेल्वे स्थानकादरम्यान तीन जणांनी रेल्वे रुळावर खडी टाकली होती.