पीटीआय, भोपाळ
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून गेल्या चार महिन्यांत घडलेली ही सातवी घटना आहे.
फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’चा संरक्षित खुल्या पिंजऱ्यात मृतदेह आढळून आला. चार वर्षांच्या ‘तेजस’चा भांडणामध्ये मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे कुनोमधील ज्येष्ठ वनाधिकारी जे. एस. चौहान यांनी सांगितले. अधिकृत पत्रकानुसार मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास ६ क्रमांकाच्या संरक्षित क्षेत्रात कर्मचाऱ्यांना तेजसच्या मानेवर काही जखमा आढळल्या. त्यानंतर उपचारांपूर्वी त्याला बेशुद्ध करण्यासाठी योग्य परवानग्या मिळाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पशुवैद्यकांचे पथक तेथे पोहोचले. मात्र त्यावेळी हा चित्ता मृतावस्थेत आढळून आला.
९ मे रोजी ‘दक्षा’ या मादीच्या मृत्यूनंतर चित्त्यांना जंगलात सोडण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ९ जुलै रोजी ‘प्रभाश’ आणि ‘पावक’ या दोन चित्त्यांना जंगलामध्ये मोकळे सोडण्यात आल्यानंतर पुन्हा ही घटना घडली.
चार महिन्यांतील सातवी घटना
२७ मार्च रोजी ‘साशा’ या चित्त्याच्या मादीचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर २३ एप्रिल रोजी ‘उदय’ याचा तर ९ मे रोजी ‘दक्षा’ हिचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक वर्षांनी भारतात जन्मलेल्या ‘ज्वाला’च्या चार बछडय़ांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. ‘तेजस’ हा चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दगावलेला सातवा चित्ता असल्यामुळे या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.