पीटीआय, गुरुग्राम / नुह : हरियाणामधील नुह येथे सोमवारी सुरू झालेला हिंसाचार थोपविण्यात मंगळवारीही प्रशासनाला यश आले नाही. हिंसाचारात जीव गमवावा लागलेल्यांची संख्या पाच झाली असून यात दोन होमगार्डचा समावेश आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मध्ये एका मशिदीवर मंगळवारी हल्ला झाला. यात एकाचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुहमध्ये झालेल्या हिंसाचारात १० पोलिसांसह २३ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ११ एफआयआर दाखल करण्यात आल्या असून २७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दंगेखोरांनी किमान १२० वाहनांची नासधूस केली. त्यापैकी ५० वाहने पेटवून देण्यात आली. जाळलेल्या वाहनांमधील आठ वाहने पोलिसांची होती.

हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. नुह आणि सोहना येथे पोलिसांनी ध्वजसंचलन केले. सर्व धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नुह आणि फरीदाबाद येथे बुधवापर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुग्राम, फरीदाबाद आणि पालवाल जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शैक्षणिक संस्था मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या.

गुरुग्राममध्ये जमावाने एका मशिदीवर हल्ला करून आग लावली. यात नायब इमाम (२६) याचा मृत्यू झाला. जमावाने केलेल्या गोळीबारात दोघे जण जखमी झाले आहेत. गुरुग्रामच्या बादशाहपूर येथे दुपारी हिंसक जमावाने एका भोजनालयाला आग लावली आणि त्याच्या लगतच्या दुकानांची तोडफोड केली. जमावाने विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या मालकीच्या दुकानांची नासधूस केली आणि एका मशिदीसमोर घोषणाबाजी केली. बादशाहपूर बाजारही पोलिसांनी मंगळवारी बंद ठेवला.  काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून हा हिंसाचार घडवून आणला गेला, असा  आरोप हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केला.

शांतता समित्यांच्या बैठका

शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मंगळवारी नुह आणि सोहना येथे हिंदू आणि मुस्लीम समुदायाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली. यावेळी शांतता राखण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दोन्ही बाजूंनी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोषींची ओळख पटवण्यात मदत करण्याचे आवाहन पोलीसांनी यावेळी केले. शहरामध्ये सामाजिक सौहार्द पूर्ववत करा व अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन गुरुग्रामचे उपायुक्त निशांत कुमार यादव यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another day of violence in haryana the death toll is five ysh
Show comments