मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानानंतर सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले होते. तसेच न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षाही सुनावली होती. दरम्यान, आता राहुल गांधी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कमल भदोरिया यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार सत्र न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा – “सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर…”, पदवीवरून केजरीवालांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
नेमके काय आहे प्रकरण?
भारत जोडो यात्रेदरम्यान अंबाला येथे झालेल्या सभेदरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख ‘२१ व्या शतकातील कौरव’ असा केला होता. २१ व्या शतकातील कौरव खाकी पॅट परिधान करतात, हातात काठी घेतलेले असतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसेच हा देश पुजाऱ्यांच्या नव्हे तर तपस्वी लोकांचा आहे, असे विधानही त्यांनी केले होते.
१२ एप्रिल रोजी होणार सुनावणी
दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी झाल्याचा दावा कमल भदोरिया यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी हरिद्वार सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून १२ एप्रिल रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.