टर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांतील हा दुसरा भूकंप आहे. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसले. यामुळे टर्कीमध्ये पुन्हा हाहाकार उडाला आहे. दरम्यान, भूकंपामुळे आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर पाच हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
तत्पूर्वी सोमवारी पहाटे चार वाजता टर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं प्रमुख केंद्र गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर, तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते. तसेच हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला होता.
टर्कीबरोबरच इतर देशातही भूंकपाचे धक्के
महत्त्वाचे म्हणजे या भूकंपामुळे टर्कीबरोबच सीरियाम, सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले होते.
भारत सरकारकडून मदत
दरम्यान, भूकंपामुळे टर्कीमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून भूंकपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. अशातच भारतही टर्कीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बचावकार्यासाठी भारत सरकारने NDRF च्या दोन टीम टर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शोहमोहीम आणि बचावकार्यासाठी भारत रिलीफ मटेरियलदेखील पाठवणार आहे.