भारताचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये शनिवारी (७ ऑक्टोबर) ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारची धांदल उडाली आहे. या धक्क्यातून अफगाणिस्तान अद्याप सावरलेला नाही, तोच चार दिवसात अफगाणिस्तानमध्ये आणखी एक भूकंप झाला. पश्चिम अफगाणिस्तान ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरला आहे. जमिनीखाली १० किलोमीटर खोल या भूकंपाचं केंद्र होतं, असं सांगण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शनिवारी आलेल्या भूंकपात २,५०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या शनिवारी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीन धक्के बसले. या तिन्ही भूकंपांची तीव्रता ६.३, ५.९ आणि ५.९ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात अनेक गावं भुईसपाट झाली आहेत. शेकडो नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. शेकडो घरं जमीनदोस्त झाली आहेत. तर हजारो घरांची अंशतः पडझड झाली आहे.
हे ही वाचा >> Israel Hamas War : पॅलेस्टाईन नव्हे, ‘या’ देशात रचला इस्रायलवरील हल्ल्याचा कट, हमासला दोन देशांकडून मदत
तालिबान सरकारने म्हटलं आहे की गेल्या दोन दशकांमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे. जिंदा जान प्रांतात भूकंपाने १२०० बळी घेतले आहेत. तर येथील भूकंपात १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच शेकडो नागरिक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार येथील २० गावांमधील तब्बल २००० घरं भुईसपाट झाली आहे. जून २०२२ मध्ये पूर्व अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपात १,००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.