जगभरातील दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर नजर ठेवून असलेल्या पॅरिसस्थित फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स म्हणजेच एफएटीएफच्या करडय़ा यादीत पाकिस्तान आणखी चार महिने राहण्याची शक्यता आहे, असे वृत्त आहे. या संस्थेने अतिरिक्त निकषांनुसार ठरवून दिलेले लक्ष्य पूर्ण करणे पाकिस्तानला अद्याप जमले नाही. त्यामुळे जूनपर्यंत तरी पाकिस्तान करडय़ा यादीतच राहील, अशी शक्यता आहे. पाकिस्तान हा जून २०१८ पासून एफएटीएफच्या करडय़ा यादीत आहे. दहशतवाद्यांना छुप्या रीतीने होणारा अर्थपुरवठा थांबविण्यात पाकिस्तानला यश न आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानला यासाठी एक योजनाही देण्यात आली होती. ती या देशाने ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. एफएटीएफने दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यात पाकिस्तानला अद्याप यश न आल्याने तो या संस्थेच्या करडय़ा यादीत कायम आहे. एफएटीएफच्या शुक्रवारच्या बैठकीत पाकिस्तानबाबत आढावा घेतला जाणार होता. दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा थांबविणे, तसेच मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी २०२१ मध्ये ठरवून दिलेल्या उपाययोजना जानेवारी २०२३ पर्यंत प्रत्यक्षात आणण्याचे लक्ष्य आता पाकिस्तानने ठेवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा