Husband Suicide: पत्नीशी वाद आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेला कंटाळीन बंगळुरूमध्ये अतुल सुभाष यांनी महिन्याभरापूर्वी स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर संबंध देशात खळबळ उडाली. यानंतर मागच्याच आठवड्यात दिल्लीतही असेच एक प्रकरण समोर आले होते. यानंतर आता राजस्थानच्या बोटाड येथेही असाच एक प्रकार घडला आहे. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर आता पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ नुसार पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत पतीने व्हिडीओ रेकॉर्ड करत पत्नीला धडा शिकवा, अशी आपल्या कुटुंबियांकडे मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत पतीचे नाव सुरेश सथादिया (३९) असे असून बोटाड जिल्ह्याच्या झामराला गावात ३० डिसेंबर रोजी त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर सुरेश यांच्या मोबाइलमधील व्हिडीओ पाहून कुटुंबियांनी पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केली. या व्हिडीओमध्ये पती सुरेश हे नैराश्यात असल्याचे दिसत आहे. पत्नीने आपल्याला मानसिक त्रास दिल्याचे ते सांगत आहेत. त्यांनी म्हटले की, तिला आयुष्यभर लक्षात राहिल, असा धडा शिकवा. ती ना माझी झाली, ना मुलांची झाली. तिने मला दगा दिला असून मरण्यासाठी भाग पाडले आहे.

हे वाचा >> Video: “तू फट्टू आहेस…”, पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; अतुल सुभाष प्रकरणासारखा व्हिडीओ रेकॉर्ड केला

सथादिया दाम्पत्याचे १७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना चार मुले आहेत. १५ आणि १० वर्षांच्या दोन मुली आणि सहा आणि चार वर्षांची दोन मुले आहेत.

आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड केला

एफआयआरनुसार, मृत पती आणि पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. त्यामुळे पत्नी माहेरी जाऊन राहत असे. आत्महत्या करण्यापूर्वीही त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. नाराज होऊन माहेरी गेलेल्या पत्नीला पुन्हा आणण्यासाठी सुरेश साथाडिया सासरी गेले. पण पत्नीने त्यांच्याबरोबर येण्यास नकार दिल्यामुळे ते परत आले. त्यानंतर घरी व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांनी आत्महत्या केली. सुरेश सथाडिया यांनी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करून आत्महत्या केली. पण सदर व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला नाही किंवा कुणालाही पाठवला नाही.

अतुल सुभाष प्रकरण काय होते?

बंगळुरूमध्ये ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि२४ पानांची सुसाइड नोट लिहिली. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियावर अतुल सुभाष यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. अतुल यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी पत्नीने तीन कोटी आणि मुलाला भेटू देण्यासाठी तीस लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप अतुल सुभाष यांच्या भावाने केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another husband dies by suicide record video accusing wife of mental torture kvg