सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी प्रशिक्षणार्थी वकील तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होत असतानाच आता याच स्वरुपाचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत असताना एका न्यायाधीशांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला आहे. संबंधित विद्यार्थिनी पश्चिम बंगाल राष्ट्रीय विधी विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, तिने सरन्यायाधीशांकडे या प्रकाराविरोधात तक्रार दाखल केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
पीडित विद्यार्थिनी अधिकृतपणे संबंधित न्यायाधीशांकडे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असतानाच तिच्यावर हा प्रसंग गुजरल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मे २०११ मध्ये पीडित तरुणीचा प्रशिक्षणाचा कालावधी सुरू झाला. त्यावेळी आरोप करण्यात आलेल्या न्यायाधीशांच्या कार्यालयाकडून विधीविषयक परिषदा आयोजित केल्या जात होत्या.
पीडित तरुणीने गेल्या महिन्यात या प्रकाराविरोधात सरन्यायाधीशांकडे सविस्तर तक्रार केली. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात तिला फारशी मदत करू शकणार नसून, तिने घडल्या प्रकाराविरोधात कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा, अशी सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पत्रामध्ये पीडित तरुणीने संबंधित न्यायाधीशांनी आपला दोन वेळा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. न्यायाधीशांच्या या वागण्यामुळे खूपच निराश झाल्याने तिने आपले प्रशिक्षणही अर्धवट सोडून दिले. या प्रकाराबद्दल तिने आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही सांगितले होते.
न्या. गांगुली यांच्या विरोधात अन्य एका प्रशिक्षणार्थी वकील महिलेने केलेल्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतरच याही पीडित तरुणीने सरन्यायाधीशांकडे आपल्यावर गुजरलेल्या प्रकाराविरोधात तक्रार करण्याचे निश्चित केले.

Story img Loader