दिल्ली भाजपा नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्याविरोधात आणखी एक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बग्गा यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करताना मोहाली न्यायालयाने पंजाब पोलिसांना भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी पंजाब पोलिसांनी दिल्ली भाजपाचे प्रवक्ते बग्गा यांना मोहालीमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. या अटकेनंतर भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होती. त्याचवेळी पंजाब पोलीस बग्गा यांना अटक केल्यानंतर दिल्लीहून मोहालीला घेऊन जात होते. मात्र दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून पंजाब पोलिसांना हरियाणातील कुरुक्षेत्र येथे थांबवले. दिल्ली पोलिसांच्या पथकाने बग्गा यांना त्यांच्या संरक्षणात दिल्लीत आणले होते. बग्गा यांच्या अटकेसंदर्भात पंजाब पोलिसांविरुद्ध दिल्लीत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाली पोलिसांनी तेजिंदर यांच्याविरुद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

आता बग्गा यांच्याविरुद्ध १५३ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जात-धर्म आणि विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहाली कोर्टाने वॉरंट जारी करताना पंजाब पोलिसांना भाजपा नेत्याला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मोहाली कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मे रोजी ठेवली आहे. विशेष म्हणजे पंजाब पोलिसांनी बग्गा यांना यापूर्वीच या प्रकरणात हजर राहण्याची नोटीस बजावली होती.

बग्गा यांच्या अटकेबाबत भाजप चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे. दिल्ली भाजपाचे अनेक नेते बग्गा यांच्या घरी पोहोचले. भाजप खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रमुख तेजस्वी सूर्या यांनीही तेजिंदर पाल सिंग बग्गा आणि त्यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे सीबीआयने पंजाबमधील संगरूरमधील आम आदमी पक्षाचे आमदार जसवंत सिंह गज्जन माजरा यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. आप आमदारावर ४० कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा आरोप आहे. संगरूरमध्ये सीबीआयने तीन ठिकाणी परिसराची झडती घेतली. माहितीनुसार, छाप्यांदरम्यान सीबीआयने ९४ स्वाक्षरी केलेले कोरे चेक आणि अनेक आधार कार्ड जप्त केले आहेत.

Story img Loader