Digital Arrest : एका निवृत्त कर्नलची डिजिटल अरेस्ट द्वारे ३ कोटी ४१ लाखांना फसवणूक केल्याचं प्रकरण दोन आठवड्यांपूर्वीच घडलं. त्यानंतर आता आणखी एका निवृत्त कर्नलला अशाच पद्धतीने फसवण्यात आल्याची घटना घडली आहे. या निवृत्त कर्नलला ३६ लाख रुपयांना फसवण्यात आलं. आम्ही मुंबईच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याचं या निवृत्त कर्नलला भासवण्यात आलं होतं.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरमोहिंदर सिंग पुरी हे ९१ वर्षांचे गृहस्थ आहेत. पुरी हे चंदीगडचे रहिवासी आहे. १० नोव्हेंबर २०२४ ला त्यांना Whats App वर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पुरी यांना तुमचं कॅनरा बँकेत खातं आहे का? ते विचारलं. पुरी यांनी नकार दिला. त्यानंतर तुमच्या नावे बनावट अकाऊंट कॅनरा बँकेत उघडण्यात आलं आहे आणि तुमच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आला आहे असं सांगितलं. ही घटना महाराष्ट्रात घडली आहे आणि आम्ही मुंबई पोलीस आहोत असं भासवून पुरी यांची फसवणूक करण्यात आली आहे. तसंच तुमचं आधार कार्डही आम्हाला मिळालं आहे.

नरेश गोयल यांच्याबाबत कॉलरने पुरी यांना काय सांगितलं?

या कॉलमध्ये पुरी यांना विचारण्यात आलं की तुम्ही नरेश गोयल यांना ओळखता का? त्यावर पुरी म्हणाले की मला ठाऊक आहे त्यांना अटक झाली आहे. त्यावर कॉल करणारा म्हणाला त्यांच्या घरावर आणि ऑफिसवर धाडी पडल्या आहेत त्यात अनेक आधार कार्ड्स सापडली आहेत तुमचंही आधार त्यात आहे असं पुरी यांना सांगण्यात आलं. तसंच तुमच्या नावाने जे बनावट खातं कॅनरा बँकेत उघडण्यात आलं त्यातून गोयल यांना पैसे देण्यात आले आहेत असंही सांगितलं.

पुरी यांना अटकेची धमकी देण्यात आली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरी यांना अटकेची धमकी देण्यात आली. मोबाइल चार्जरवर ठेवा असं सांगण्यात आलं. त्यानंतर मोबाइलच्या कॅमेरावर तुम्हाला उपस्थित रहावं लागेल हे सांगितलं. तसंच पुरी यांना बँक खात्याबाबत आणि मुदत ठेवींबाबत विचारलं. ज्यानंतर पुरी यांनी दोन खात्यांची माहिती दिली. अटकेच्या भीतीने पुरी यांनी ज्या सूचना मिळाल्या त्यांचं पालन केलं. त्यांच्या खात्यातून त्यांनी आरटीजीएसद्वारे ३६ लाख रुपये ICICI बँकेच्या खात्यात पाठवले. यानंतर आणखी पैसे पाठवण्यासाठी पुरी यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यावेळी त्यांचा मुलगा पुष्पिंदर पुरी हा त्यांचा मुलगा घरी होता. त्याला घडला प्रकार संशयास्पद वाटला. त्याने त्याने तातडीने पोलीस ठाणं गाठलं त्यानंतर हा सगळा प्रकार फ्रॉड असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.