मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. अलीकडेच इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली होती. इम्रान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये अनेक हिंसक आंदोलने झाली. इम्रान खान यांच्या समर्थकांनी लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला. सध्या इम्रान खान जामिनावर बाहेर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण आता पुन्हा एकदा इम्रान खान यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ला प्रकरणात इम्रान खान यांच्यावर आणखी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी तीन खटले कठोर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.

इम्रान यांच्याविरोधात ९ मे रोजीच्या हिंसेप्रकरणी तीन आणि १० मे रोजीच्या हिंसेप्रकरणी अन्य तीन खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्यानंतर त्यांच्या पाकिस्तान तेहेरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या समर्थकांनी देशभर हिंसक निदर्शने केली. संतप्त जमावाने २० पेक्षा अधिक नागरी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. दरम्यान, इम्रान खान समर्थकांनी रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात घुसून तोडफोड केली.

पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच नागरिकांनी लष्कराच्या सामर्थ्यांला आव्हान दिले होते. याशिवाय निदर्शकांनी लाहोरमध्ये ‘जिना हाऊस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कमांडर कॉर्प्स दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचीही जाळपोळ केली होती. या सर्व प्रकरणांमध्ये तपास पथकांमार्फत संयुक्त तपास केला जात आहे. आतापर्यंत इम्रान खान यांच्याविरोधात १५० पेक्षा जास्त खटले दाखल करण्यात आले आहेत. यातील तीन खटले कठोर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या.