जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. १२ मे रोजी बडगाम जिल्ह्यात महसूल विभागाचे कर्मचारी राहुल भट यांची अतिरेक्यांनी गोळी घालून हत्या केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात, बडगामच्या चदूरा भागात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यानं अंदाधुंद गोळीबार करत टीव्ही कलाकार अमरीन भटचा खून केला होता. या घटना ताज्या असताना आता जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आणखी एक दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे.
दहशतवाद्यांनी कुलगाम येथील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या केली आहे. रजीनी भल्ला असं मृत पावलेल्या महिला शिक्षिकेचं नाव आहे. त्या दक्षिण काश्मीरमधील कुलगाम भागातील गोपालपोरा येथील एका सरकारी शाळेत स्थलांतरित शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
आज सकाळी झालेल्या या हल्ल्यात रजीनी भल्ला गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात गेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी एका ट्विटद्वारे दिली आहे.
मृत महिला शिक्षिका रजीनी भल्ला या जम्मू विभागाच्या सांबा येथील रहिवासी होत्या. गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सहभाग असणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरच शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असं आश्वासन जम्मू काश्मीर पोलिसांकडून देण्यात आलं आहे.