Suicide Due to Work Pressure : पुण्यात एका २६ वर्षीय तरुणीचा कामाच्या अतिताणाने मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, चेन्नईत एका तरुणाने कामाच्या अतिताणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मूळचा तामिळनाडमधील थेनी जिल्ह्यातील कार्तिकेयन त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह चेन्नईत राहत होता. त्याला १० आणि ८ वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते एका सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. कामाच्या अतिताणामुळे कार्तिकेयन अस्वस्थ होता. तो नैराश्येत गेल्याने त्याच्यावर उपचारही सुरू होते, असं पोलिसांनी सांगितलं.

घटनेच्या वेळी कार्तिकेयन एकटाच घरी होती. त्याची पत्नी के. जयरानी सोमवारी चेन्नईपासून ३०० किमी अंतरावरील थिरुनाल्लूर मंदिरात गेली होती. जाताना तिने तिच्या मुलांना आईकडे सोडलं होतं. गुरुवारी रात्री ती घरी परतली. तिने दरवाजा ठोठावला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अतिरिक्त चावीने तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडाच तिला समोर तिच्या पतीचा मृतदेह दिसला. पतीने शरीराभोवती करंट असलेली वायर गुंडाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा >> ‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पुण्यात सीए तरुणीचा मृत्यू

अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी समाज माध्यमावर याबाबत गुरुवारी घोषणा केली आहे. ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ईवाय इंडियाच्या पुणे कार्यालयात ॲना यंदा १८ मार्चला रुजू झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला होता. तिच्या आईने ईवाय इंडियाच्या प्रमुखांना लिहिलेला ई-मेल समाजमाध्यमांत व्हायरल झाला असून, याप्रकरणी कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी अखेर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.