सततच्या गोंधळामुळे उद्विग्न झालेले राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी मंगळवारी सभागृहातील सदस्यांना उद्देशून सभागृहात अराजकाची स्थिती निर्माण व्हावी, अशी तुमची इच्छा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. भारतीय जनता पक्षाने अन्सारी यांचे वक्तव्य मागे घेण्याची तर सत्ताधारी पक्षाने सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याची मागणी केली.
राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी सुरू झाल्यावर प्रश्नोत्तराच्या तासात पहिला प्रश्न उपस्थित झाल्यावर लगेचच सभागृहात गोंधळ सुरू झाला. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारांच्या मुद्द्यावरून भाजपच्या सदस्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. हरियाणातील काही जमीन व्यवहारांमध्ये वढेरा यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. कॉंग्रेसच्या सदस्यांनीही भाजपच्या सदस्यांच्या आरोपांना घोषणाबाजीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी अखंड आंध्र प्रदेशचा संदेश लिहिलेले शर्ट सभागृहात झळकावले आणि वेगळ्या तेलंगणाला विरोध करण्यास सुरुवात केली. अन्सारी यांनी सर्व सदस्यांना त्यांच्या जागेवर बसण्यास आणि प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे होऊ देण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने अन्सारी यांनी उभे राहून सर्व सदस्यांना उद्देशून सभागृहात अराजकाची स्थिती निर्माण व्हावी, अशी तुमची इच्छा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.

Story img Loader