बर्फ नष्ट होत असल्याच्या माहितीला नासाच्या संशोधनामुळे छेद
अंटाक्र्टिकामध्ये बर्फ वितळल्याने हानी होत असली तरी नासाच्या नव्या संशोधनानुसार या खंडावर जेवढे बर्फ नष्ट होत आहे त्यापेक्षा अधिक नव्याने निर्माण होत आहे. अंटाक्र्टिकावरील हिमनद्या नष्ट होत असल्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच हा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज म्हणजे आयपीसीसीच्या २०१३ मधील अहवालास यामुळे आव्हान दिले गेले आहे. त्या अहवालानुसार अंटाक्र्टिकावरील बर्फ वेगाने नष्ट होत आहे. उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार अंटाक्र्टिकावरील बर्फात १९९२ ते २००१ दरम्यान दरवर्षी ११२ अब्ज टन इतकी वाढ झाली आहे व २००३ ते २००८ या काळात बर्फाचे थर वर्षांला ८२ अब्ज टनांनी कमी होत गेले; म्हणजेच बर्फ वाढलेले दिसते. नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरचे हिमनद्यातज्ज्ञ जे झ्व्ॉली यांनी सांगितले की, अंटाक्र्टिकातून बर्फ नष्ट होत आहे व पश्चिम अंटाक्र्टिकातील थ्वाईटस व पाईन बेटांवर हा परिणाम जास्त दिसत आहे, या इतर संशोधनांशी मी सहमत आहे. पूर्व अंटाक्र्टिका व पश्चिम अंटाक्र्टिकाचा अंतर्गत भाग याविषयी आमचे मतभेद आहेत, कारण तेथे बर्फ नष्ट होण्याच्या प्रमाणापेक्षा बर्फ निर्माण होण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असले तरी अंटाक्र्टिकातील बर्फाची स्थिती पूर्ववत होण्यास काही वर्षे लागतील. अंटाक्र्टिका द्वीपकल्प व पश्चिम अंटाक्र्टिका या ठिकाणी बर्फ वाढण्याचे गेल्या दोन दशकातील प्रमाण कायम राहिले तर २० ते ३० वर्षांत बर्फ नष्ट झाल्याची हानी भरून निघणार आहे. या अभ्यासातील विश्लेषणानुसार अंटाक्र्टिकातील बर्फाच्या थराची जाम्डी युरोपियन स्पेस एजन्सीच्या दूरसंवेदन उपग्रहांवरील रडार अल्टीमीटरने मोजली आहे. १९९२ ते २००१ दरम्यान ही निरीक्षणे करण्यात आली आहेत. २००३ ते २००८ दरम्यानही या बर्फाच्या थरांचे संशोधन करण्यात आले आहे. दहा हजार वर्षांपूर्वी जादा हिमवृष्टी झाली होती व ती नंतर बर्फाच्या थराच्या रूपात साठून राहिली, त्यामुळे सहस्रकात बर्फाचा थर तयार झाला. पूर्व अंटाक्र्टिका व अंतर्गत पश्चिम अंटाक्र्टिका येथे दरवर्षी १.७ सेंटीमीटरने बर्फाचा थर वाढत गेला. यामुळे हिमनद्या वितळण्याचे प्रमाण कमी होऊन सागरी पातळी वाढण्याचे प्रमाण कमी होणार आहे. अंटाक्र्टिकातील हिम वितळण्याने आता सागरी पातळीत वाढ होत असल्याचे दिसत नाही, पण मग आयपीसीसी अहवालात म्हटल्याप्रमाणे दरवर्षी सागरी पातळीत ०.२७ मिलिमीटरची वाढ कशामुळे होत आहे असे बघितले तर त्यामागे दुसरे काही कारण असू शकते ही वाईट बातमी आहे. ‘ग्लॅशियॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा