Anti Ageing Influencer Bryan Johnson : प्रसिद्ध अँटी-एजिंग इन्फ्लुएंसर ब्रायन जॉन्सन यांना त्यांच्या पहिल्या भारत भेटीदरम्यान येथील वायू प्रदूषणाचा सामना करावा लागला. झेरोधाचे संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत पॉडकास्ट रेकॉर्ड करत असताना खोलीतील असह्य हवेच्या गुणवत्तेमुळे जॉन्सन यांना रेकॉर्डिंग मध्येच सोडून निघून जावे लागले. N95 मास्क घालून आणि सोबत एअर प्युरिफायर घेऊनही जॉन्सन धोकादायक हवेच्या परिस्थितीला तोंड देऊ शकले नाहीत. यामुळे त्यांच्या त्वचेवर, डोळ्यांवर आणि घशावर कायमचा परिणाम झाला. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रेकॉर्ड होत असलेला हा पॉडकास्ट एअर प्युरिफायर असलेल्या खोलीत सेट करण्यात आला होता. परंतु, जॉन्सनने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. बाहेरील हवा खोलीत शिरत असल्याने एअर प्युरिफायर कुचकामी ठरला असल्याचं जॉन्सन यांनी म्हटलंय.

खोलीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुमारे १३० होता, ज्यामध्ये PM२.५ ची पातळी ७५ µg/m³ पर्यंत पोहोचली. ही पातळी २४ तासांच्या कालावधीत ३.४ सिगारेट ओढण्याइतकी आहे. या अनुभवामुळे त्यांच्या डोळ्यांना आणि घशाला त्रास झाला. त्यामुळे जॉन्सनने अखेर रेकॉर्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला.

वायू प्रदूषणामुळे हानिकारक परिणाम

भारतातील हवेच्या गुणवत्तेच्या स्थितीबद्दल जॉन्सन यांनी केलेले भाष्य देशातील हवामानाची विदारक स्थिती स्पष्ट करते. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांची माहिती अनेक लोकांना नसते. वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवलेली असली तरीही भारतातील लोक मास्कसारख्या संरक्षणात्मक उपायांशिवाय घराबाहेर पडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

“भारतात वायू प्रदूषण इतके सामान्य झाले आहे की आता कोणीही ते लक्षातही घेत नाही”, असं जॉन्सन म्हणाले. इतक्या उच्च पातळीच्या प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या त्वचेवर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होत आहे. जन्मापासूनच या परिस्थितींना तोंड देणारी मुले आणि अर्भके वायू प्रदूषणाच्या दीर्घकालीन परिणामांना विशेषतः असुरक्षित असतात ही चिंताजनक वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनास आणून दिली.

वायू प्रदूषण राष्ट्रीय आपत्ती का नाही?

सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे प्रचंड पुरावे असूनही, भारतात हवेच्या गुणवत्तेच्या समस्यांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून का मानले जात नाही असा प्रश्न जॉन्सन यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, सर्व कर्करोग बरे करण्यापेक्षा वायू प्रदूषणाचे निराकरण केल्यास भारतीय लोकसंख्येचे आरोग्य अधिक प्रभावीपणे सुधारेल. “मला कळत नाहीय की भारतातील नेते हवेच्या गुणवत्तेला राष्ट्रीय आपत्ती का बनवत नाहीत”, असं जॉन्सन म्हणाले.

Story img Loader