देशात काँग्रेसविरोधी लाट आली असून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. तीन राज्यात स्पष्ट बहुमत तर दिल्लीत सर्वाधिक जागाजिंकणाऱ्या भाजपच्या विजयाचे श्रेय राजनाथ सिंह यांनी स्थानिक नेत्यांना दिले. देशात मोदी लाट आली आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून राजनाथ सिंह यांनी मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ भाजपला मिळाल्याचे ठोस प्रतिपादन केले. दिल्लीसह चारही राज्यात भाजपचेच मुख्यमंत्री होतील, असे राजनाथ सिंह म्हणाले. मतदान केंद्र स्तरावर काम करणाऱ्या सामान्य कार्यकत्याच्या परिश्रमाचे आज चीज झाले आहे. देशभर सत्ताविरोधी लाट नसून काँग्रेसविरोधी लाट आली आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये तर सत्ताधाऱ्यांच्या समर्थनाची लाट आली आहे. चार राज्यातील मतदारांनी काँग्रेसला नाकारले. चारही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारामुळे भाजपला मोठा लाभ झाला. दिल्लीतदेखील योग्यवेळीच हर्षवर्धन यांना उमेदवारी घोषीत झाली. आम आदमी पक्षामुळे कोणतेही लाभ अथवा नुकसान झाले नाही, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.
मोदी लाटेला इतर पक्षांची चपराक
मुंबई
चार राज्यांचा निकाल म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास, असे जाणिवपूर्वक वातावरण भाजपने प्रचाराच्या काळात तयार केले असले तरी हा निकाल म्हणजे मोदी यांची देशात लाट नाही, असा हल्ला विविध राजकीय पक्षांनी भाजपवर चढविला आहे. मोदी लाट ही अतिशोयक्ती असल्याचे तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केले. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये स्थानिक नेतृत्वामुळे भाजपला सत्ता मिळाली. दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये मोदी यांचा प्रभाव चालला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. मतदारांचा कौल भाजपाला अनुकूल नाही, असा निष्कर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काढला आहे. निकाल भाजपला अनुकूल नाहीत तर पर्याय नसल्यानेच मतदारांनी भाजपला मतदान केले, असेही भाकपचे चिटणीस डी. राजा यांनी म्हटले आहे.
वाढदिवशी दुखवटा
चार राज्यांच्या निकालांमध्ये काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यामुळे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसावर ‘दुखवटय़ाची गडद छाया’ पसरली आहे. ६८ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या सोनिया गांधी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र यामागे निवडणुकांचा निकाल हे कारण नसून नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला असल्याचे कारण पुढे केले जात आहे.
मोदींचाच विजय!
निवडणुकांना राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा रंग देण्याचा प्रयत्न भाजपने आणि माध्यमांनीही केला. त्यामुळेच काँग्रेसचा धुव्वा म्हणजे मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब असून सार्वत्रिक निवडणुकीतही हेच चित्र दिसेल, असे भाजपकडून प्रचारिले जात आहे. या धामधुमीत गुजरातमध्येही रविवारी मोदींचाच विजय झाला. सूरत पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत येथून पूर्णेश मोदी यांनी ८६ हजार मते मिळवली. काँग्रेसचे डी. एल. पटेल हे अवघी १९ हजार मते मिळाल्याने पराभूत झाले.
आकडा आणि मते
प्रचारसभांना उसळलेली गर्दी मतपेटीत प्रतिबिंबित होत नसेलही पण प्रचारसभांना रोडावलेली उपस्थिती मात्र दुर्लक्षिण्यासारखी बाब नाही, असे सूचक विधान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी ट्विट केले आहे. प्रचारसभांत मोदींच्या सभांना मोठी गर्दी तर राहुल यांच्या सभांना कमी गर्दी होती, त्या पाश्र्वभूमीवर अब्दुल्ला यांनी हा शेरा मारला आहे. ‘आम आदमी’च्या अनुषंगाने ते म्हणाले की, राजकारणातल्या नवख्या नेत्याला कधी कमी लेखू नका, हे लक्षात ठेवले पाहिजे.