चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून देशात काँग्रेसविरोधाची लाट असल्याचेच ध्वनित होत असल्याचे बिगरभाजपवाद्यांचे म्हणणे आहे. या निवडणुकांत भाजपला जनादेश मिळाला असला तरी तो मोदींचा करिश्मा असल्याचे मात्र या बिगरभाजपवाद्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी दिल्ली व छत्तीसगढची उदाहरणे दिली आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि दिल्ली या चारही राज्यांतील मतदारांनी काँग्रेसला नाकारले आहे. या चारही राज्यांत भाजपला बहुमत मिळाले असले तरी त्यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिश्मा असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री व एनडीएचा एकेकाळचा विश्वासू साथीदार असलेल्या जेडीयूचे नेते नितीशकुमार यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘चार राज्यांत काँग्रेसला मतदारांनी झिडकारले याचा अर्थ देशात काँग्रेसविरोधी लाट आहे. परंतु या विजयाने भाजपने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण मोदींच्या करिश्म्यामुळे चार राज्यांत भाजपला यश मिळालेले नाही तर काँग्रेसविरोधी लाटेमुळे भाजपला सत्ता मिळाली आहे. त्या त्या राज्यांतील मतदारांमध्ये काँग्रेसविषयी राग होता. तो त्यांनी मतदानयंत्राद्वारे व्यक्त केला. दिल्लीत भाजपला बहुमत प्राप्त करता येऊ शकले नाही आणि छत्तीसगढमध्ये सत्ता हातातून जाता जाता वाचली. याचा अर्थ असा होतो की चारही राज्यांत नरेंद्र मोदींचा प्रभाव काहीच पडला नाही. उलटपक्षी आम आदमी पक्षाचे कौतुक करावे लागेल. कोरी पाटी असलेल्या या पक्षाने दिल्लीत सत्ताधाऱ्यांना तर धूळ चारलीच, शिवाय भाजपलाही सत्तेत येण्यापासून रोखले आहे. त्यामुळे जिथे जिथे भाजप व काँग्रेस या दोघांऐवजी तिसरा पर्याय मतदारांसमोर उभा राहतो तिथे साहजिकच तिसरा पक्षच मजबूत ठरतो’.

सुशीलकुमार मोदींचा टोला
भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष सुशीलकुमार मोदी यांनी मात्र नितीशकुमार यांचा हा मुद्दा खोडून काढला. चारही राज्यांत मोदींचा करिश्मा होता असे ते म्हणाले. नितीश यांना त्यांनी शहामृगाची उपमा दिली. शहामृगाने डोळे बंद करून घेतल्याने वादळ येण्याचे जसे थांबत नाही तसाच हा प्रकार असल्याचे सुशीलुकमार म्हणाले. मोदी यांनी चारही राज्यांत केलेल्या झंझावाती प्रचारामुळे भाजपकडे मते खेचली गेली असे सुशीलकुमार म्हणाले. काँग्रेसविरोधाची लाट हाही या निवडणुकांत महत्त्वाचा घटक होता असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनाही खूश
भाजपचा विश्वासू साथीदार असलेल्या शिवसेनेने मात्र विजयाचे श्रेय काँग्रेसविरोधी लाटेला देतानाच या निकालांमुळे काँग्रेसचा जनाधार किती भुसभुशीत झाला आहे याची प्रचीती येत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने नोंदवली आहे. या विजयाबद्दल शिवसेना नेतृत्वाने भाजपच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

माकपची टीका
चार राज्यांच्या निकालांवरून काँग्रेसचा देशातील जनाधार लोप पावत चालला असल्याचेच दिसून येते, अशी टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये भाजप गेली दहा वर्षे सत्तेत होता. तरीही काँग्रेसला तेथून विजय प्राप्त करता आला नाही. यातूनच देशाचा मूड काँग्रेसविरोधी असल्याचेच स्पष्ट होते असे येचुरी म्हणाले. भाजप-काँग्रेसव्यतिरिक्त उत्तम पर्याय उपलब्ध असेल तर मतदार त्यांनाही संधी देतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीत आम आदमी पक्षाने मारलेली मुसंडी असेही येचुरी म्हणाले.

Story img Loader