अमेरिकेच्या संसदेत इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केलं. यावर संसदेत मतदान झालं. यात २१९ खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवत कायदा करण्याच्या बाजूने मतदान केलं, तर २१२ खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. विधेयकाच्या मंजुरीवर बहुमत झाल्यानं हा कायदा अमेरिकेच्या संसदेत मंजूर झाला. आता कायद्यात रुपांतरीत होण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळणं आवश्यक असणार आहे.
खासदार इल्हान ओमर यांनी ३० खासदारांच्या समुहाचं नेतृत्व करत अमेरिकन संसदेत इस्लामोफोबियाविरोधातील हे विधेयक ऑक्टोबर २०२१ मध्ये मांडलंय. या विधेयकावर मतदान होण्याआधी बोलताना इल्हान ओमर म्हणाल्या, “सध्या आपण जगभरात मुस्लिमांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचारात आणि भेदभावाच्या आश्चर्यकारक वाढीच्या मध्यावर आहोत. जगभरात इस्लामोफोबिया पसरत आहे आणि त्याविरोधात कसं काम करायचं यावर आपण जगाचं नेतृत्व केलं पाहिजे.”
ओमर यांनी सादर केलेल्या विधेयकातील तरतुदी खालीलप्रमाणे,
१. इस्लामोफोबियाशी संबंधित घटनांवर लक्ष ठेवणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विभागाची स्थापना करणे.
२. यासाठी विशेष दुताची नेमणूक करून त्याला या विभागाचं नेतृत्व देणे.
३. अशाप्रकारच्या गुन्ह्यांची माहिती संसदेत सादर करणे.
रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांकडून विधेयकाला जोरदार विरोध
दरम्यान, अमेरिकन संसदेत हे विधेयक सादर झाल्यावर रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्कॉट पेरी यांनी याला जोरदार विरोध केला. तसेच विधेयक सादर करणाऱ्या इल्हान ओमर यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “अमेरिकेच्या करदात्यांना विधेयक सादर करणाऱ्या खासदार ज्या संघटनेशी संबंधित आहेत अशा दहशतवादी संघटनांना पैसे देण्यासाठी सक्ती करायला नको.”
हेही वाचा : धक्कादायक, खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठं लैंगिक शोषण, ५०० खेळाडूंवर अत्याचार, अखेर ३ हजार कोटींची भरपाई
रिपल्बिकन पक्षाचे खासदार लॉरेन बोयबर्ट यांनी इल्हान ओमर यांना दुय्यम दर्जाच्या मुस्लीम खासदार म्हटलं होतं. याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आला होता. ओमर यांचा जन्म सोमालियात झालाय आणि त्या जिहाद स्कॉडच्या सदस्य देखील होत्या.