समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्याविरोधात बोलण्यास पक्षश्रेष्ठींनी मनाई केल्यामुळे बिथरलेले केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तसेच काँग्रेस पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. यादव यांच्याविरोधात बोलण्यास आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दांत वर्मा यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांच्याविरुद्ध रोष व्यक्त केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून वर्मा यांनी मुलायमसिंह यादव यांच्यावर टीकेचा भडिमार करीत त्यांना सातत्याने लक्ष्य केले आहे. ‘मुलायमसिंह यादव पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात आहेत, पण आधी त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाडू मारण्याची नोकरी मिळवावी,’ अशी जळजळीत टीका काही दिवसांपूर्वी वर्मा यांनी केली होती. त्यावरून समाजवादी पक्षाचा भडका उडाल्यानंतर वर्मा यांना बोलावून मिस्त्रींनी समज दिली आणि वर्मा यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा करीत भविष्यात ते अशी विधाने करणार नाहीत, असे जाहीरपणे सांगितले. पण त्यामुळे वर्मा यांचे माथे ठणकले. मिस्त्रींच्या विधानानंतर आज सकाळपासूनच ते संतप्त झाले होते. यादव यांच्याविरुद्ध आपली टीका काँग्रेसला सहन होत नसेल तर आपल्याला मंत्रिपदावरून काढून टाकावे. आपली राजीनामा देण्याचीही तयारी आहे. आपण भेकड नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांपाशी संताप व्यक्त केला. मिस्त्री यांची तक्रार करण्यासाठी वर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेण्याचे ठरविले आहे. मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देत असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचा बेनीप्रसाद वर्मा मुद्दाम व वारंवार अपमान करीत असल्यामुळे काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे.