पीटीआय, चेन्नई
वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी असलेल्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेतून तमिळनाडूला सूट मिळण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्याचे आश्वासन द्रमुकचे अध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी रविवारी दिले. ही परीक्षा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी स्टालिन यांचे पुत्र व कॅबिनेट मंत्री उदयनिधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने रविवारी राज्यव्यापी उपोषण आंदोलन केले.या केंद्रीय पात्रता परीक्षेतून तमिळनाडूला सूट मिळेपर्यंत द्रमुक थांबणार नाही, असे स्टालिन यांनी सांगितले. मात्र, नीट परीक्षेचे ‘राजकीयीकरण’ करत असल्याबद्दल विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी द्रमुकवर टीका केली.
आपण राज्याच्या ‘नीट’विरोधी विधेयकावर कधीही स्वाक्षरी करणार नाही, असे अलीकडेच म्हणालेल्या तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनाही स्टालिन यांनी लक्ष्य केले. आता हा मुद्दा राष्ट्रपतींकडे असून, राज्य विधानसभेने उचललेले मुद्दे राष्ट्रपती भवनापर्यंत नेण्याचे ‘पोस्टमन’सारखे राज्यपालांचे काम आहे, असे ते म्हणाले.