फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून पेन्शन सुधारणा विरोधी आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा आवडता कॅफे La Rotonde Bistro पेटवलं. पॅरीसमध्ये हे कॅफे आहे या कॅफेवर आंदोलकांनी हल्ला केला आणि तिथे जाळपोळ केली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तसंच या घटनेचा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे. पेन्शन सुधारणा विरोधी आंदोलक हे थोडे थोडके नाहीत तर सुमारे ३५ लाख आहेत. पॅरीस गेल्या काही दिवसांपासून जळतं आहे. पॅरीसमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

पेन्शन सुधारणा योजना लागू करण्याचा निर्णय जेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी घेतला तेव्हापासूनच लोक रस्त्यावर उतरले आहेत. या संदर्भातलं विधेयक आणलं गेलं आहे. ज्यामुळे मॅक्रो यांचं सरकारच राजकीय संकटात सापडलं आहे कारण लोकांनी या निर्णयाचा विरोध करत रस्त्यावर उतरणं पसंत केलं आहे. पॅरीसमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पॅरीसच नाही तर फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये उतरून लोक या निर्णयाचा विरोध करत आहेत. मॅक्रो यांनी विशेष अधिकाराच्या अंतर्गत हा निर्णय घेतला मात्र तो फ्रान्सच्या जनतेला अजिबात पटलेला नाही.

फ्रान्स सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे?

फ्रान्स सरकारने आणीबाणीच्या तरतुदीच्या अंतर्गत एक विधेयक आणलं आहे. ज्यानुसार फ्रान्समधल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे ६२ वरून ६४ करण्यात आलं आहे. पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी मार्च महिन्यात हा निर्णय जाहीर केला होता. राष्ट्राध्यक्षांच्या विशेषाधिकारात हा निर्णय घेत आहोत असंही त्यांनी सांगितलं. मात्र या विधेयकाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. तसंच मतदानही पार पडलेलं नाही. सदनात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचा पक्ष अल्पमतात आहे.

१९ मार्चच्या आधी हा निर्णय जाहीर झाला आहे. मात्र त्यानंतर गेले दोन ते तीन आठवडे फ्रान्समधले लोक विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. तसंच दुसरीकडे काही विरोधी खासदारांनी निवृत्तीचं वय वाढवण्याच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Story img Loader