स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मुद्दय़ावर आंध्र प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून राज्याच्या किनारपट्टी भागासह रायलसीमा भागात मंगळवारी सलग सातव्या दिवशी तेलंगणविरोधी निदर्शने सुरूच राहिली. स्वतंत्र तेलंगण मुद्दय़ावर दोन सरकारी कार्यालयांमध्येही समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
एकसंध आंध्र प्रदेश राज्याचे समर्थक असणाऱ्या विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्याच्या सीमेलगतच्या रायलसीमा आणि हैदराबाद शहरांमध्ये रस्त्यावर उतरून स्वतंत्र तेलंगण राज्याला विरोध केला. यासाठी रास्ता रोको आणि मोर्चाचेही आयोजन करण्यात आले. राज्याच्या अनेक भागांत मोर्चे, निदर्शने करण्यात आली असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) हरिष कुमार गुप्ता यांनी सांगितले.
जल आणि विद्युत विभागाशी संबंधित सरकारी कार्यालयांमध्ये सीमांध्र भागातील कर्मचारी आणि तेलंगण भागातील कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते. दोन्ही बाजूंच्या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
सीमांध्र भागातील कर्मचाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकून आंध्र प्रदेश सचिवालयासमोर निदर्शने करून स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. स्वतंत्र तेलंगणविरोधी आंदोलनामुळे राज्यातील अनेक भागांमधील शैक्षणिक संस्था, दुकाने, कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. अनंतपूरमध्ये निदर्शकांनी रेल्वेगाडी अडविण्याचा प्रयत्न केला. धरमवरम, पेनुकोंडांसह राज्याच्या अनेक भागांत निदर्शने करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2013 रोजी प्रकाशित
स्वतंत्र तेलंगणविरोधी निदर्शने अद्याप सुरूच
स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मुद्दय़ावर आंध्र प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून राज्याच्या किनारपट्टी भागासह रायलसीमा भागात मंगळवारी सलग सातव्या दिवशी तेलंगणविरोधी निदर्शने सुरूच राहिली.
First published on: 07-08-2013 at 02:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti telangana protests continue in andhra pradesh for the seventh day