दोन पोलिसांचा मृत्यू; काही जण ओलीस
पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात ‘पाकिस्तानी तालिबान’च्या दहशतवाद्यांनी सोमवारी दहशतवादविरोधी केंद्रावर कब्जा मिळवला. त्यांनी येथे काही जणांना ओलीस ठेवले. या वेळी झालेल्या चकमकीत दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले आहेत.
दहशतवादविरोधी पथकांनी अटक केलेल्या काही दहशतवाद्यांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत होती. त्याच वेळी यापैकी एका दहशतवाद्याने रविवारी पोलिसांकडून ‘एके-४७’ रायफल हिसकावून घेतली व गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्यांनी दहशतवादविरोधी केंद्राच्या संकुलावर ताबा मिळवून कैदेतील इतर दहशतवाद्यांची सुटका केली. त्यांनी अनेक पोलिसांनाही ओलीस ठेवले. या केंद्रात लष्करी कारवाई अनेक तास सुरू होती.
या प्रांताचे माजी मुख्यमंत्री अक्रम खान दुर्रानी व मंत्री मलिक शाह मोहम्मद दहशतवाद्यांशी चर्चेसाठी बन्नू येथे पोहोचले आहेत. दुर्रानी व मोहम्मद दोघेही बन्नूचे आहेत. ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्यांनी त्यांना सुरक्षितरीत्या अफगाणिस्तानात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी सुरक्षा दलांकडे केली.