‘ईव्हीएम’वरील शंकेवरून टीका
बांकुरा : निवडणुकीत पराभव होणार याचा अंदाज आल्यामुळेच, दहा वर्षांपूर्वी सत्ता मिळवून देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) आधीच शंका घेणे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सुरू केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.
राज्याच्या विकासासाठी आणि युवकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ‘असोल परिवर्तन’ (खरे परिवर्तन) बंगालमध्ये येत आहे. आता भ्रष्टाचाराचा खेळ चालणार नाही (खेला होबे ना) असेही मोदी म्हणाले.
‘आपला पराभव होणार अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे दीदींनी ईव्हीएमवर आधीच शंका घेणे सुरू केले आहे. प्रत्यक्षात याच ईव्हीएममुळे १० वर्षांपूर्वी त्या सत्तेवर आल्या होत्या’, असे मोदी यांनी एका भरगच्च निवडणूक प्रचार सभेत सांगितले.
ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते अशी भीती व्यक्त करून, या यंत्रांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन ममता बॅनर्जी पक्ष कार्यकर्त्यांना करत आहेत.
ममता बॅनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर लाथ मारत असल्याचे दाखवणाऱ्या तृणमूलच्या पोस्टर्सचा मोदी यांनी उल्लेख केला. ‘देशातील १३० कोटी लोकांच्या सेवेत माझे शिर नेहमीच झुकलेले असते. दीदी माझ्या डोक्यावर पाय ठेवून लाथ मारू शकतात, पण मी त्यांना बंगालच्या लोकांच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही’, असे मोदी म्हणाले.
आयुष्मान भारत, पीएम- किसान आणि लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण (डीबीटी) योजनांमध्ये घोटाळे करता आले नाहीत, म्हणून येथील तृणमूल सरकारने राज्यात या योजना राबवल्या नाहीत, असा दावा मोदी यांनी केला. ‘‘भाजप ‘योजनांवर’ (स्कीम्स) चालतो, तर तृणमूल काँग्रेस ‘घोटाळ्यांवर’ (स्कॅम्स) चालतो’’, असा टोला त्यांनी हाणला.