पूंछमधील नियंत्रणरेषेवर हल्ला करणारे पाकिस्तानी लष्कराचेच जवान होते, असा खुलासा करणारे निवेदन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटनी यांनी गुरुवारी दुपारी लोकसभेत केले. संरक्षणमंत्री अ‍ॅंटनी यानी मंगळवारी संसदेत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी सुधारित निवेदन केले.
हल्ल्यासंदर्भात मंगळवारी केलेले वक्तव्य हे त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे केले होते. मात्र, लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन या हल्ल्यासंदर्भात सविस्तर माहिती घेतलीये. या माहितीवरून हा हल्ला पाकिस्तानी लष्कराच्या विशेष प्रशिक्षित जवानांनी केला असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अ‍ॅंटनी यांनी सांगितले. या स्वरुपाच्या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होत असल्याचे सांगून पाकिस्तानने भारताला कायम गृहित धरू नये, असेही खडे बोल त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे पाकिस्तानला सुनावले.
दरम्यान, संरक्षणमंत्र्यांच्या सुधारित निवेदनाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी स्वागत केले. मात्र, संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा अशी चूक करू नये, असा सल्लाही स्वराज यांनी त्यांना दिला.
पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर अ‍ॅंटनी यांनी संसदेमध्ये केलेले निवेदन आणि त्यापूर्वी भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तफावत असल्याकडे भाजपच्या नेत्यांनी बुधवारी संसदेचे लक्ष वेधले होते. भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी पूंछमधील सरला छावणी हल्ला केल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर अ‍ॅंटनी यांनी संसदेमध्ये केलेल्या निवेदनात पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला केल्याची माहिती काढून टाकण्यात आली आणि पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा