‘जेएनयू’त अनुपम खेर यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन; कन्हैयाच्या सुटकेनंतर जल्लोष करणाऱ्यांना सुनावले
देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्याचे ऑलिम्पिक विजेता असल्यासारखे स्वागत कसे काय केले जाऊ शकते, असा तिखट प्रश्न चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी शुक्रवारी विचारला.
जवारहलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांसाठी देशद्रोहाच्या खटल्याचा वाद उद्भवल्यावर जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर टीका करणारे खेर हे ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम’ या आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी या विद्यापीठाच्या परिसरात आले होते. विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या संदर्भात ते म्हणाले की, तो जामिनावर आहे. तो काही ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक जिंकून आलेला नाही की त्याचे एवढे मोठे स्वागत करावे.
जो देशाची निंदा करतो, त्याचे हीरो म्हणून स्वागत कसे केले जाऊ शकते? त्याला ऑलिम्पिकचे पदक मिळाले आहे काय? तो जामिनावर बाहेर आला आहे. आपण गरीब कुटुंबातून आल्याचे तो सांगतो, पण माझा प्रश्न असा आहे की घरच्यांची गरिबी हटवण्यासाठी तुम्ही काय केले? मला २०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली, त्या वेळी माझ्या वडिलांचा पगार ९० रुपये होता आणि मी ११० रुपये माझ्या घरच्यांना पाठवले. त्याने काय केले, अशी विचारणा खेर यांनी केली.
तुमच्या मते देशामध्ये जे चुकीचे आहे, अशा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही बोलता, पण टीका करण्याव्यतिरिक्त तुम्ही देशाला काय योगदान दिले आहे, अशा शब्दांत खेर यांनी कन्हैयावर हल्ला चढवला.
तुम्ही अभ्यास करण्यासाठी इथे आला आहात, राजकारण करण्यासाठी नाही आणि जरी तुम्ही ते करीत असाल, तरी देशाविरुद्ध कुठलेही राजकारण करू नका, असे खेर यांनी यावेळी सुनावले.

विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
खेर यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असताना डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरूच होती. विद्यापीठातील सध्याचे वातावरण लक्षात घेता जेएनयूने आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यास नकार दिल्याचा आरोप खेर यांनी केला होता, मात्र विद्यापीठाने तो नाकारला होता.

Story img Loader