अनुपम खेर यांची टीका; मोर्चात प्रसारमाध्यमांविरोधात घोषणा
देशात वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात काही लेखक व कलाकारांनी अलीकडेच निषेध मोर्चा काढला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून अभिनेते अनुपम खेर यांनी पुरस्कारवापसी विरोधात राष्ट्रपती भवनावर कलाकारांचा मोर्चा काढून निवेदन सादर केले. या वेळी प्रसारमाध्यमांतील व्यक्तींना धक्काबुक्की झाल्याचे समजते. पुरस्कारवापसीने देशातील स्थितीचे चुकीचे चित्र रंगवले जात असून देशाची बदनामी केली जात आहे, असे मत खेर यांनी व्यक्त केले.
भारत हा सहिष्णू देश आहे. काही लोकांनी अहिष्णुता हा शब्द चलनात आणला आहे. ते मोजकेच लोक आहेत. ढोंगी धर्मनिरपेक्षतावादावर आमचा विश्वास नाही असे खेर यांनी सांगितले. या मोर्चात मधुर भांडारकर, अशोक पंडित, प्रियदर्शन, मनोज जोशी, अभिजित भट्टाचार्य, लेखक मधू किश्वर, यांच्यासह ४० जण सहभागी होते. त्यांनी सह्य़ांचे निवेदन सादर केले.
नॅशनल म्युझियम ते राष्ट्रपती भवनदरम्यान खेर यांच्या नेतृत्वाखाली ‘मार्च फॉर इंडिया’ मोर्चा काढण्यात आला. पण काही लोकांनी माध्यमविरोधी घोषणा दिल्याने व पत्रकारांशी बाचाबाची झाल्याने गालबोट लागले. काही लोकांनी माध्यमे पक्षपाती आहेत व सोयीची पत्रकारिता करतात असा आरोप त्यांनी केला.
भारतीय संस्कृती सहिष्णुतेच्या पलीकडे -मोदी
भारतीय संस्कृती सहिष्णुता आणि स्वीकारार्हतेच्या चर्चेच्या पलीकडे गेली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली ५१ कलावंत आणि लेखकांनी मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केले. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ समाजातील काही घटक करीत असलेल्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त करून हा त्यांचा राजकीय कार्यक्रम असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.