पीटीआय, कोलंबो
मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके रविवारी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. निवडणूक आयोगाने दुसऱ्या फेरीची मतमोजणी केल्यानंतर ५६ वर्षीय दिसानायके यांना विजयी घोषित करण्यात आले. ते मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे नेते आहेत. दिसानायके यांनी समगी जन बलवेगया (एसजेबी) पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव केला.

‘एकेडी’ नावाने परिचित असलेले दिसानायके सोमवारी अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांच्या रूपाने श्रीलंकेला पहिल्यांदाच मार्क्सवादी विचारसरणीचा अध्यक्ष मिळाला आहे. भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि राजकीय संस्कृतीत बदल घडवण्याचे आश्वासन यामुळे तरुण मतदारांची दिसानायके यांना विशेष पसंती असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दिसानायके यांच्या एनपीपीला २०१९च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ तीन टक्के मते मिळाली होती. ते मूळचे उत्तर मध्य प्रांतातील ग्रामीण थंबुटेगामाचे रहिवासी आहेत. त्यांनी कोलंबोमधील केलनिया विद्यापीठातून विज्ञानात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

हेही वाचा >>>Manish Sisodia : “तुरुंगात असताना मुलाची फी भरायला लोकांकडे भीक मागावी लागली”, मनीष सिसोदियांनी व्यक्त केली खंत

श्रीलंकेत शनिवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. रविवारच्या मतमोजणीत पहिल्या फेरीमध्ये दिसानायके यांना ४२.३१ टक्के तर प्रेमदासा यांना ३२.८ टक्के मते मिळाली. या फेरीत कोणालाही ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते न मिळाल्यामुळे निवडणूक आयोगाने दुसऱ्या फेरीसाठी मतमोजणी केली. श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच दुसऱ्या फेरीची मतमोजणी करावी लागली आहे. ७५ वर्षीय मावळते अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना पहिल्या फेरीत आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये स्थान मिळवण्यातही अपयश आले. त्यांना केवळ १७.२७ टक्के मते मिळाली. २६ महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीनंतर झालेल्या पराभवामुळे त्यांनी भावूक होऊन राजकारणाचा निरोप घेतला. एका निवेदनाद्वारे त्यांनी दिसानायके यांना शुभेच्छा दिल्या. ‘‘गेली दोन वर्षे आपण श्रीलंकेची लहान मुलासारखी काळजी घेतली. आता तुमच्या नेतृत्वात आपल्या देशाला तुम्ही सुखरूप पुढे न्याल’’, अशी अपेक्षा विक्रमसिंघे यांनी व्यक्त केली. २०२२मध्ये गोटाबाया राजपक्ष यांच्या कारकीर्दीत आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या जनतेने उठाव केल्यानंतर त्यांनी सत्ता सोडली होती. विक्रमसिंघे यांनी आर्थिक संकट आणि राजकीय अस्थैर्य यातून देशाला बाहेर काढण्याची अवघड जबाबदारी पार पाडल्याचे मानले जाते.

एनपीपीचे भारताबाबत धोरण काय?

अनुरा दिसानायके यांनी १९८७मध्ये ‘एनपीपी’चा मातृपक्ष असलेल्या ‘जेव्हीपी’मध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यावेळी ‘जेव्हीपी’ भारतविरोधी बंडामध्ये सहभागी होता. त्या पक्षाने १९८७च्या राजीव गांधी आणि जे. आर. जयवर्देना यांच्यादरम्यान झालेल्या भारत-श्रीलंका कराराला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हटवले होते. हा करार म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वावर घाला आहे असा आरोप तेव्हा ‘जेव्हीपी’ने केला होता. मात्र, दिसानायके यांनी फेब्रुवारी २०२४मध्ये भारताचा दौरा करून आपली भारताविषयीची भूमिका बदलल्याचे संकेत दिले होते.