पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर आधारीत पुस्तक इतिहासकार भविष्यात संदर्भ म्हणून वापरतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यांनी केले आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर आधारीत ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता PFIचा कट? ईडीने केला मोठा दावा
काय म्हणाले अनुराग ठाकूर?
“’सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताबद्दल आणि भारत सरकारच्या योजनांबद्दलच्या विचारांचा विश्वकोश आहे. या पुस्तकात १० प्रकरणांमध्ये पंतप्रधान मोदींची ८६ भाषणे आहेत. या भाषणांमधून त्यांचा सामाजिक समस्यांबद्दल असलेला अभ्यास दिसून येतो. या अभ्यासामुळेच भारत आज महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. भविष्यातील इतिहासकारांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांची काम करण्याची विशेष पद्धत आहे. समाजातल्या प्रत्येक घटनापर्यंत विकास पोहोचवण्याची त्यांची तळमळ त्यांच्या कामातून दिसून येते. त्यामुळे देशातील नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी अतूट प्रेम आणि विश्वास आहे. सर्वच क्षेत्रातील लोकांनी संपर्कात राहण्याची त्यांची क्षमता उल्लेखनिय आहे. विविध आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांनी पंतप्रधान मोदींचे जगातील सर्वात आवडते पंतप्रधान म्हणून वर्णन केले आहे.”
हेही वाचा – NIAच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PFI कडून देशात…”;
“या पुस्तकात पंतप्रधान मोदींचे परराष्ट्र संबंधांवरील भाषण, अर्थव्यवस्थेवरील त्यांचे विचार, कलम ३७०, काश्मीर वाद, लदाख काशी विश्वनाथ धाम, केदारनाथ धाम, अयोध्या, देवघर, इत्यादी सांस्कृतिक वारसासंदर्भातील विचार आहेत. तसेच पर्यावरण, विविध मंत्रालयांची कामे, फिटनेस, योग आणि क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सरकारचे यश, कृषी याविषयी या पुस्तकांत माहिती दिली आहे”, असेही ते म्हणाले.