भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांच्याविरोधात भारतातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन पुकारले आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणावरून गेल्या आठवड्याभरापासून विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह अनेकांनी जंतरमंतरवर ठाण मांडले आहे. यावेळी विनेश फोगाट यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यावरही आरोप केले आहेत.
विनेश फोगाट ब्रिजभुषण आणि क्रीडामंत्र्यांवर टीका करताना म्हणाल्या की, “सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या शक्तीशाली व्यक्तीविरोधात उभं राहणं कठीण आहे. आंदोलन करण्याआधी आम्ही काही अधिकाऱ्यांनाही भेटलो. परंतु, काहीही कारवाई करण्यात आली नाही.”
“जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्याआधी तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही काही अधिकाऱ्यांना भेटलो. महिला कुस्तीपटूंचं कशाप्रकारे लैंगिक शोषण केलं जातं, याविषयी आम्ही त्यांनी माहिती दिली. परंतु, काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही धरणे आंदोलन छेडले”, असं विनेश फोगाट म्हणाल्या.
हेही वाचा >> “हवं तर मला फासावर लटकवा पण…” बृजभूषण सिंह यांचं आंदोलक कुस्तीगीरांना हात जोडून आवाहन
यावेळी विनेश फोगाट यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यावरही गंभीर आरोप केले. “आम्ही आमचं आंदोलन क्रीडामंत्र्यांशी बोलल्यानंतर मागे घेतलं होतं. सर्व कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाविषयी माहिती दिली होती. परंतु, त्यांनी समिती स्थापन करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. कोणतीही कारवाई करण्यात आली नाही”, असंही त्या म्हणाल्या. विनेश फोगाट यांनी आता थेट क्रीडामंत्र्यांवरच टीका केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी ब्रिजभुषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, याप्रकरणानंतरही ब्रिजभुषण यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. राजीनामा दिल्यास मला माझा गुन्हा मान्य आहे, असं समजलं जाईल, म्हणून त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.
आंदोलन ऑलिम्पिकविषयी नाही, लैंगिक छळाविरोधात
दरम्यान, ऑलिम्पिकच्या निवडीसाठी काही कडक नियम करण्यात आल्याने हे आंदोलन छेडले जात असल्याचा आरोप बजरंग पुनिया यांच्यावर करण्यात आला. हा आरोप खोडून काढत त्यांनी हे आंदोलन ऑलिम्पिकविषयी नसून लैंगिक छळाविरोधातील आहे, असं ते म्हणाले.