दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेत (डीडीसीए) १९९९ ते २०१३ या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या आर्थिक अनियमितताप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी बुधवारी काँग्रेस आणि आपने केली. या कालावधीत जेटली डीडीसीएचे प्रमुख होते.
दिल्ली सरकारने चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीला या कालावधीत संघटनेत मोठय़ा प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे आढळले आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र जेटली यांनी या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे. विशिष्ट आरोप केल्याशिवाय आपण त्याची दखल घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. डीडीसीएच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर चौकशी आयोग नियुक्त करण्याचे प्रस्तावित करण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सूचित केले होते.
‘आप’ही आक्रमक
डीडीसीएतील अनियमिततेची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘आप’नेही केली आहे. जेटलींच्या १३ वर्षांच्या कारकीर्दीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. जेटली अर्थमंत्रिपदावर असेपर्यंत या प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असे आपने म्हटले आहे.