Tim Cook Apple CEO Salary : जगप्रसिद्ध मोबाइल कंपनी अ‍ॅपलने त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकार टिम कूक यांना २०२४ मध्ये १८ टक्के अशी घसघशीत पगारवाढ दिली होती. त्यामुळे कूक यांना २०२४ मध्ये कंपनीकडून एकूण सुमारे ६४३ कोटी रुपये पगार मिळाला आहे. जो २०२३ मध्ये ५४४ कोटी रुपये होता. कंपनीने त्यांच्या वार्षिक प्रॉक्सी फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

दरम्यान टिम कूक यांचा पगार तीन भागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये त्यांना २५.८ कोटी रुपये मूळ पगार, ५०१ कोटी रुपये स्टॉक अवॉर्ड्स आणि ११६ कोटी रुपये अतिरिक्त भरपाई यांच समावेश आहे. टीम कूक यांच्या या पगार वाढीचे मुख्य कारण म्हणजे स्टॉक आवॉर्ड्सचे वाढलेले मूल्य हे आहे.

२०२२ मध्ये स्वतःच कमी केला होता पगार

टिम कूक यांना २०२४ मध्ये मिळालेला हा पगार २०२२ मध्ये कूक यांना मिळणाऱ्या एकूण पगारापेक्षा खूपच कमी आहे. २०२२ मध्ये कूक यांना जवळजवळ १०० दशलक्ष डॉलर्स इतका पगार मिळाला होता. कर्मचारी आणि भागधारकांच्या आक्षेपानंतर टिम कूक यांनी स्वतःचा पगार कमी केला होता. दरम्यान २०२५ साठी कूक यांच्या एकूण पगारात कोणाताही बदल होणार नसल्याचे अ‍ॅपल कंपनीच्या संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे अ‍ॅपल कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारातही किंचित वाढ झाली आहे. २०२४ मध्ये, अ‍ॅपल रिटेल प्रमुख, माजी मुख्य वित्तीय अधिकारी), मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आणि जनरल कौन्सिल यांना सुमारे २३३ कोटी रुपयांपेक्षा अधिक पगार मिळाला आहे.

कोण आहेत टिम कूक?

टिम कुक हे अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्याचे पूर्ण नाव टिमोथी डोनाल्ड कूक असे आहे. त्यांनी सन १९९८ मध्ये अ‍ॅपल कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली होती. त्यांनी २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्यानंतर अ‍ॅपलचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून ते कंपनीचे नेतृत्त्व करत आहेत. याचबरोबर टिम कूक हे नाईके आणि नॅशनल फुटबॉल फाउंडेशनच्या संचालक मंडळावर देखील आहेत.

टिम कूक हे फॉर्च्यून ५०० कंपनीचे पहिले सीईओ आहेत, ज्यांनी त्यांच्या समलैंगिकतेची सार्वजनिकरित्या कबुली दिली होती. अब्जाधीश असेलेले टिम कुक जगातील आघाडीच्या सीईओंपैकी एक आहेत जे समलैंगिक आहेत. टिम कुक यांनी स्वतः त्यांची लैंगिक ओळख उघड केली होती. २०१४ मध्ये, टिम कुक यांनी सांगितले होते की, त्यांना समलैंगिक असल्याचा अभिमान आहे.

Story img Loader