पीटीआय, नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शशी थरूर यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी मंगळवारी आयफोनवर ‘सरकार पुरस्कृत सायबर हल्ल्या’चा इशारा मिळाल्याचा आरोप केला. या खासदारांनी पुराव्यादाखल इशाऱ्याचे प्रतिमांकन (स्क्रीनशॉट) ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रसृत केले. त्यानंतर केंद्र सरकारने हे आरोप फेटाळले असले, तरी आरोपांची दखल घेत चौकशीचे आदेशही दिले. ‘पेगॅसस’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा सरकारवर हेरगिरी आरोप झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
‘सरकार पुरस्कृत हल्लेखोर दूरस्थ पद्धतीने तुमच्या आयफोनवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असा इशारा देणारा ‘स्क्रीनशॉट’ मोइत्रा यांनी ट्विटरवर प्रसृत केला. त्यानंतर लगोलग काँग्रेसचे थरूर व पवन खेरा, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रियंका चतुर्वेदी, आपचे राघव चढ्ढा आणि माकपचे सीताराम येचुरी यांच्यासह अन्य खासदारांनी असेच इशारे मिळाल्याचे जाहीर केले. थरूर यांनी अॅपलच्या ईमेल आयडीची सत्यता तपासल्याचेही स्पष्ट केले व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांना ‘टॅग’ केले. त्यानंतर गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘‘मुद्दय़ांवरून लक्ष भरकटवण्याचे सरकारचे धोरण आहे. अदानी प्रकरणावरून सरकारमध्ये घबराट पसरली आहे,’’ अशी टीका त्यांनी केली. के. सी. वेणुगोपाल, टी. एस. सिंगदेव आणि सुप्रिया श्रीनाते यांनाही असे ईमेल आल्याची माहिती गांधी यांनी दिली. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून विरोधी खासदारांचे संरक्षण करण्याची विनंती करणार असल्याचे मोइत्रा यांनी सांगितले. ‘अॅपल’कडून आलेल्या या सूचनेमुळे पेगॅसस स्पायवेअर घोटाळय़ाची आठवण झाली, असे ट्विट चड्ढा यांनी केले. मोदी सरकारच्या नेतृत्वात हॅकिंग आणि टेहळणी करणारे शासन स्थापित झाल्याची टीका येचुरी यांनी केली.
हेही वाचा >>>“मोदी सरकारकडून विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न”, केंद्रीय मंत्री आणि Apple कंपनी स्पष्टीकरण देत म्हणाले…
दरम्यान, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश देत असल्याचे जाहीर केले. ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सर्ट-इन) मार्फत ही चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याप्रकरणी ‘अॅपल’ने खुलासा करावा असे आवाहन केले. अॅपलने वारंवार आपली उपकरणे गोपनीयतेच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा दावा केला आहे, तरीही १५०पेक्षा जास्त देशांमधील लोकांना अशा प्रकारचे नोटिफिकेशन का पाठवण्यात आले, असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी विरोधी खासदारांचा आरोप खोटा असल्याचा दावा केला. ‘कथित सरकार पुरस्कृत हल्ल्यावरून वादळ निर्माण करणार आणि आपण बळी पडत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार.. पण नेहमीप्रमाणे हा फुसका बार निघणार आहे’, असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले. याप्रकरणी अॅपलने स्पष्टीकरण द्यावे. ज्यांना काही समस्या असतील तर त्यांनी गुन्हा दाखल करावा, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिला.
अधिक माहितीस ‘अॅपल’चा नकार
विरोधी पक्षांच्या खासदारांना मिळालेली सूचना कोणत्याही विशिष्ट सरकार पुरस्कृत सायबर हल्लेखोरांबाबत आहे का याची माहिती देऊ शकत नाही, असे ‘अॅपल’ने जाहीर केले. असे इशारे का दिले जातात याबद्दलही माहिती देण्यास कंपनीने नकार दिला. असे हल्ले शोधण्याचे काम ‘इंटेलिजन्स सिग्नल’द्वारे केले जाते हे सिग्नल सदोष आणि अपूर्ण असू शकतात. त्यामुळे या धोक्याच्या सूचना खोटय़ाही असू शकतात किंवा अनेकदा हल्ले झाल्याचे समजतही नसल्याचे अॅपलने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>सचिन पायलट यांचा सारा अब्दुल्लांशी घटस्फोट, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा
इशाऱ्याच्या ईमेलमध्ये काय?
तुमचे आयफोन सरकार पुरस्कृत हल्लेखोरांकडून लक्ष्य होत असल्याची शक्यता आहे. तुम्ही कोण आहात आणि काय करता याआधारे व्यक्तिगतरित्या तुमची निवड झालेली असू शकेल. तुमचा आयफोन सरकार पुरस्कृत हल्लेखोरांचा शिकार झाला झाला असेल, तर दूरस्थ पद्धतीने महत्त्वाची माहिती, संभाषण त्यांना मिळू शकेल. तुमचा कॅमेरा आणि माइकही वापरला जाऊ शकेल. हा इशारा चुकीचाही असू शकतो, मात्र ही सूचना गांभीर्याने घ्या..
जितकी हेरगिरी करायची तेवढी करा, आम्ही प्रश्न विचारतच राहणार. आम्ही घाबरत नाही. हवे तितके फोन टॅप करा. तुम्हाला माझा फोन हवा असेल तर मी तुम्हाला तो देतो. – राहुल गांधी, काँग्रेस खासदार
सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा देणारा संदेश आणि ईमेल अॅपलकडून प्राप्त झाला. केंद्रीय गृह मंत्रालयाने यात वेळ घालवू नये. अदानी आणि पंतप्रधान कार्यालयातील दंडेली करणाऱ्यांना वाटणाऱ्या भीतीची कीव येते. – महुआ मोइत्रा, खासदार, तृणमूल काँग्रेस</strong>
सर्व नागरिकांची गोपनीयता आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्याची भूमिका सरकार गांभीर्याने घेत असून या संदेशाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आम्ही तपास करू. आम्ही ‘अॅपल’लाही याबाबत खरी, अचूक माहिती देऊन तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. – अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री