अॅपलचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस तसेच अॅपल वॉच २ चे बुधवारी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आले. आयफोन ७ हे ६४९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४३,१०० रुपये) तर आयफोन ७ प्लस हे ७४७ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४९, ७०० रुपये) असणार आहे. तर अॅपल वॉच २ ची किंमत ३६९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार २४,५०० रुपये) असणार आहे.
सॅनफ्रान्सिस्कोमध्ये खचाखच भरलेल्या सभागृहात अॅपलच्या उत्पादनांचं अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात एका व्हिडीओने झाली. या व्हिडीओत कूक कार्यक्रमासाठी गाडीने रवाना झाल्याचे दाखवण्यात आले. हा व्हिडीओ संपल्याच्या काही क्षणातच टीम कूक मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम कुक यांनी अॅपल म्यूझिक आणि अॅपल स्टोअरविषयी माहिती दिली. यात त्यांनी मारिओ या सुप्रसिद्ध गेम अॅप स्टोअरवरही उपलब्ध असेल असे जाहीर केले. या गेमचे नाव सुपर मारिओ रन असे असणार आहे. यानंतर त्यांनी बहुप्रतिक्षित अॅपल वॉच २ लाँच केले. OS 2 वर चालणारे अॅपल वॉचमध्ये बिल्ट इन जीपीएस असणार आहे. अॅपल वॉच २ हे जलरोधकही असणार आहे. पोकेमॉन गो हा गेमदेखील या वॉचवर खेळणे शक्य होईल. याशिवाय क्रीडाप्रेमींसाठी अॅपल वॉच नाइकी प्लस हे उत्पादनही बाजारात आणले आहे. अॅपल वॉच २ आणि अॅपल वॉच नाइकी प्लस या दोघांची किंमत ३६९ डॉलर्स असणार आहे.
अॅपल वॉच लाँच केल्यानंतर कूक यांनी अॅपल ऑपरेटिंग सिस्टम iOS विषयी माहिती दिली. अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टमसाठी तुमचे डिव्हाईसदेखील अत्याधुनिक असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. कूक यांनी अप्रत्यक्षपणे आयफोन ७ कडे इशारा केला आणि मग सर्वांनाच उत्सुकता असलेले आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस हे फोन्स लाँच केले. हे दोन्ही फोन १० बाबतीत अन्य आयफोनपेक्षा सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. यात डिझाईन, कॅमेरा, परफॉमन्स आदी मुद्द्यांचा समावेश आहे. १६ सप्टेंबरपासून ही सर्व उत्पादन अमेरिकेतच्या बाजारपेठेत उपलब्ध होतील. भारतातील अॅपलप्रेमींना या उत्पादनांसाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.