मोदी सरकार इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन हॅक करून हेरगिरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा देणारे संदेश अ‍ॅपल कंपनीकडून या नेत्यांना पाठवण्यात आल्याचं तथाकथित प्रकरण आज (३१ ऑक्टोबर) सकाळी समोर आलं. “कदाचित शासनपुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे कुणी आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे”, असे संदेश या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आप खासदार राघव चड्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी यासंदर्भात तक्रार केली असून एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांच्या फोन हॅकिंगच्या आरोपांवर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं आहे. वैष्णव म्हणाले, केंद्र सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहे. अनेक खासदारांनी केलेल्या तक्रारींमुळे आम्ही चिंतेत आहोत.

दुसऱ्या बाजूला याप्रकरणी अ‍ॅपल कंपनीनेही स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, असे नोटिफिकेशन अपूर्ण माहितीवर आधारित आहेत. काही अलर्ट खोटेदेखील असतात. तसेच काही सायबर हल्ल्यांचं मूळ शोधणं किंवा ते हल्ले कोणी केले आहेत ते शोधणं अवघड असतं. आम्ही सध्या तरी याबाबत कोणतीही माहिती देण्यास असमर्थ आहोत.

अ‍ॅपलने म्हटलं आहे की, आमचे गॅजेट्स हे पूर्णपणे सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड आहेत. युजरच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणं किंवा त्यांची कोणतीही माहिती लिक होणं अवघड आहे. प्रत्येक अ‍ॅपल युजरचा अ‍ॅपल आयडी पूर्णपणे सुरक्षित आहे.

हे ही वाचा >> “शासनपुरस्कृत हल्लेखोर तुमचा फोन हॅक…”, अ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा!

अश्विनी वैष्णव म्हणाले, भारत सरकार सर्व भारतीय नागरिकांची गोपनीयता आणि सुरक्षितता कायम राखण्यास कटीबद्ध आहे. भारत सरकार नागरिकांच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका खूप गांभीर्याने घेतं. आम्ही याप्रकारच्या संदेशांच्या मूळापर्यंत जाऊन तपास करू. आम्हाला मिळालेली माहिती आणि कथित सायबर हल्ल्याबाबत आम्ही अ‍ॅपल कंपनीशी बोललो आहोत. तसेच याप्रकरणी केल्या जाणाऱ्या तपासांत त्यांनाही सामील होण्यास सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone hacking alert ashwini vaishnaw says modi govt concerned asc