Apple म्हटलं की दर्जा असंच मानण्याची प्रथा पडलेली आहे. त्याशिवाय अॅपलचे फोन किंवा इतर उत्पादने म्हणजे सुरक्षेची हमी असेही दावे फक्त कंपनीच नव्हे तर ही उत्पादनं वापरणारे युजर्सदेखील म्हणतात. पण अॅपलच्या उत्पादनामध्येच वापरकर्त्यांच्या खासगी संभाषणांचा गैरवापर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कंपनीकडून हा दावा फेटाळण्यात आला असला तरी नुकसानभरपाईसाठी ठरवण्यात आलेली ९५ मिलियन डॉलर्स म्हणजेच साधारणपणे ९.५ कोटी डॉलर दंडाची रक्कम अदा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तक्रारदार वापरकर्त्यांना प्रत्येकी सुमारे २० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात १७०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अमेरिकेती ओकलँड कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात या प्रकरणाची सविस्तर सुनावणी चालू आहे. मंगळवारी रात्री Apple कडून सुनावणीदरम्यान दंडाची रक्कम भरण्यास तयार असल्याचं न्यायालयात सांगितलं. ही दंडाची रक्कम ९५ मिलियन डॉलर्स इतकी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, यातून प्रत्येक तक्रारदाराला साधारण २० डॉलर्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी न्यायमूर्तींच्या परवानगीची आवश्यकता असेल.
अमेरिकेतल्या काही अॅपल वापरकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. अॅपलवरील Siri ही सुविधा सुरू केल्यानंतर डिव्हाईस युजर्सचे खासगी संभाषणदेखील रेकॉर्ड करतो व ही माहिती जाहिरातदारांना दिली जाते, असा दावा वापरकर्त्यांकडून करण्यात आला आहे. साधारणपणे कोणत्याही यंत्रातील व्हॉइस असिस्टंन्सची सुविधा जोपर्यंत आपण काही ठराविक शब्दांत तसं सांगत नाहीत, तोपर्यंत सुरू होत नाही. सिरी या सुविधेसाठी Hey Siri ही कमांड दिल्यानंतर सुविधेचा वापर सुरू होतो. पण वापरकर्त्यांनी यानंतर घरातील खासगी संभाषणही रेकॉर्ड करून ते जाहिरातदारांना दिलं जात असल्याचा दावा केला.
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
..आणि त्याच प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिराती दिसू लागल्या!
दोन तक्राररादांनी दावा केलाकी ज्या उत्पादनांसंदर्भात त्यांनी उल्लेख केला होता, त्याच प्रकारच्या जाहिराती त्यांना दिसू लागल्या. एका युजरनं विशिष्ट शस्त्रक्रियेसंदर्भात त्याच्या डॉक्टरशी बोलताना उल्लेख केला असता त्या युजरला त्याचसंदर्भातील क्लिनिकच्या यांच्या जाहिराती दिसू लागल्या. या सगळ्या तक्रारींची संख्या काही लाखांमध्ये आहे. साधारणपणे या तक्रारी १७ सप्टेंबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रेकॉर्ड झालेल्या संभाषणांबाबतच्या आहेत. iPhone आणि Apple च्या स्मार्टवॉचसंदर्भात प्रामुख्याने या गोष्टी घडल्याचं तक्रारींमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दंडाची रक्कम म्हणजे Apple चा अवघ्या ९ तासांचा नफा!
दरम्यान, सदर दंडाची ९५ मिलियन डॉलर्स ही रक्कम म्हणजे अॅपल कंपनीचा फक्त ९ तासांचा नफा असल्याचं रॉयटर्सनं वृत्तात म्हटलं आहे. कंपनीनं गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ९३.७४ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी अवाढव्य उलाढाल नोंदवली आहे.