Apple iPhone Export from India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या सर्व देशांवर सरसकट रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात समन्यायी व्यापार कर लागू केला आहे. प्रत्येक देशासाठी हे प्रमाण कमी-जास्त असलं, तरी किमान १० टक्के कर सगळ्यांवर लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर अतिरिक्त कर भरावा लागत आहे. २ एप्रिलपासून नवे कर लागू झाले असून त्यावर मार्ग कसा काढायचा? या विवंचनेत सर्व देश असतानाच iPhone चं उत्पादन करणाऱ्या Apple कंपनीनं यावर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे!
इतर देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर हा व्यापार कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे इतर देश म्हणजे त्या देशांमधील उत्पादक कंपन्यांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. ही उत्पादनं महाग होऊन अमेरिकेत त्यांची मागणी व विक्री घटणार आहे. या पार्श्वभूमीवर Apple नं मात्र ट्रम्प यांच्या या ‘टॅरिफ अस्त्रा’वर उपाय शोधून काढला आहे. अ‍ॅपलचा हा उपाय भारतमार्गे अमेरिकेपर्यंत पोहोचण्याचा आहे!
चीन नाही तर भारत, Apple चं मोठं पाऊल!

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के समन्यायी व्यापार कर लागू केला आहे. यासंदर्भात द्विपक्षीय चर्चा चालू असून हे दर कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे चीनवर मात्र अमेरिकेकडून ३४ टक्के व्यापार कर लागू केला आहे. शिवाय, चीननं अमेरिकेच्या या भूमिकेचा निषेध केला असून उलट अमेरिकेवरच जादा व्यापार कर लागू करण्याचा इशारा दिला आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेनंदेखील चीनवर अतिरिक्त ५० टक्के अर्थात एकूण ८४ टक्के व्यापार कर लागू करण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधून अमेरिकेत उत्पादनं निर्यात करणं जिकिरीचं होऊ शकतं.

Apple नं ही बाब ओळखून आयफोनची निर्यात भारतातून सुरू केली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवघ्या तीन दिवसांत अ‍ॅपलनं पाच विमानं भरून आयफोन अमेरिकेत निर्यात केल्याचं मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे. आता चीन विरुद्ध अमेरिका व्यापार कर वादाचा भुर्दंड बसू नये, म्हणून पुढचा काही काळ कंपनीकडून हेच धोरण अंगीकारलं जाण्याची शक्यता आहे.

Apple साठी चीन महत्त्वाचं उत्पादन केंद्र!

अ‍ॅपलचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन चीनमध्ये होतं. जागतिक पुरवठा व्यवस्थेमध्ये अॅपलसाठी चीन हे महत्त्वाचं केंद्र आहे. त्यामुळे चीनमधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर भरमसाठ व्यापार कर लागू होणं अ‍ॅपलसाठी खर्चिक बाब ठरेल. पण असं असलं, तरी भारतातही अॅपलनं उत्पादन प्रकल्पांची संख्या वाढवली आहे. गेल्या वर्षभरात अ‍ॅपलनं भारतात तब्बल अडीच कोटी आयफोनची निर्मिती केली आहे. त्यातील १ कोटी भारतात तर उरलेले १५ कोटी फोन इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आले. हे सर्व फोन अमेरिकेत निर्यात करून अ‍ॅपल अमेरिकेतील किमान ५० टक्के मागणी पूर्ण करू शकेल, असा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर एकीकडे चीन विरुद्ध अमेरिका या व्यापारयुद्धात लवकरात लवकर तोडगा निघावा याकडे अ‍ॅपलचं लक्ष असताना दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत अशा बड्या उत्पादक कंपन्यांसाठी भारत चीनसाठी पर्याय ठरू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple ti shipped iphones from india to america avoiding china amid tariff war pmw