न्यायवृंदाने गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीची शिफारस केली होती. यामध्ये देशातील विविध उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांचा समावेश होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यास केंद्र सरकारकडून दिरंगाई होत होती. अखेर आज केंद्र सरकारने न्यायवृंदाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
न्यायवृंदाच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली.”भारताच्या राज्यघटनेतील तरतुदींनुसार, राष्ट्रपतींनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. मी संबंधित सर्वांना शुभेच्छा देतो”, असं कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
नियुक्त केलेल्या पाच न्यायाधीशांची नावे:
- न्यायमूर्ती पंकज मित्तल, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती संजय करोल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती पी.व्ही. संजय कुमार, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला, न्यायाधीश, पाटणा उच्च न्यायालय
- न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालय
संबंधित पाच न्यायाधीशांनी पुढील आठवड्यात शपथ घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ पर्यंत जाईल. सध्या, सर्वोच्च न्यायालय भारताच्या सरन्यायाधीशांसह २७ न्यायाधीश कार्यरत आहे. केंद्र सरकारकडून आणखी दोन नावांना मंजुरी देणं बाकी आहे. संबंधित नावांना मंजुरी मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ इतकी होईल.