Apsara Murder Case : हैदराबाद येथील सरुर नगमधलं अप्सरा हत्याकांड चर्चेत आलं होतं. या प्रकरणात न्यायालयाने पुजारी व्यंकट साई सूर्य कृष्ण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सात वर्षांची अतिरिक्त शिक्षाही सुनावली आहे. व्यंकट साईने त्याची प्रेयसी अप्सराला लग्नाचं वचन दिलं होतं आणि त्यानंतर जेव्हा तिच्याकडून लग्नासाठी आग्रह होऊ लागला तेव्हा तिची हत्या केली. हे प्रकरण गाजलं होतं.

काय आहे अप्सरा हत्याकांड प्रकरण?

व्यंकट साई सूर्य कृष्ण हा मंदिरातला पुजारी होता. त्याची ओळख सरुर नगर येथे राहणाऱ्या अप्सरा या तरुणीशी झाली. या दोघांची मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण व्यंकट साईने अप्सराला लग्नाचं वचन दिलं होतं. अप्सरा लग्नासाठी आग्रह करु लागली. ज्यानंतर व्यंकट साईने तिची हत्या केली. २०२३ चं हे प्रकरण आहे. व्यंकट साईचं लग्न आधीच झालेलं होतं. त्याला अप्सराशी लग्न करायचं नव्हतं त्यामुळे त्याने तिची हत्या केली आणि नंतर ती बेपत्ता झाल्याचा बनाव रचला होता.

३ जून २०२३ ला काय घडलं?

३ जून २०२३ ला त्याने अप्सराला सांगितलं की आपल्याला कोईंबतूरला जायचं आहे. व्यंकट साई तिला घेऊन सरुर नगर या ठिकाणाहून रालगुडा या भागात पोहचला. तिथे दोघांनी जेवण केलं. यानंतर हे दोघंही सुल्तानपल्ली या ठिकाणी असलेल्या गोशाळेत गेले. हा सगळा कट व्यंकट साईने रचला होता. ४ जूनच्या सकाळी व्यंकट अप्सराला शमशाबादच्या नर्खोडा या गावात घेऊन गेला. तिथे दगडाने ठेचून त्याने अप्सराची हत्या केली. यानंतर त्याने अप्सराचं प्रेत कारमध्ये ठेवलं. ते प्रेत घेऊन तो सरुर नगरला आला. हे प्रेत त्याने एसआरओ ऑफिसच्या जवळ असलेल्या एका ड्रेनेजमध्ये भरलं. त्याने मृतदेह सिमेंटने लिंपला होता. अप्सराच्या बेपत्ता होण्याचा किंवा मृत्यूचा संशय कुणाला येणार नाही असं वाटलं होतं. त्यानंतर साळसूदपणे स्वतःच पोलीस ठाण्यात गेला आणि अप्सरा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. आपल्यावर संशय येऊ नये हाच त्याचा हेतू होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी पुरावे गोळा करुन केली होती व्यंकट साईला अटक

पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केल्यानंतर अखेर सगळं वास्तव समोर आलं. पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि व्यंकट साईला अटक केली. या प्रकरणी दोन वर्षे खटला चालला. विविध साक्षी पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. ज्यानंतर न्यायालयाने पुजारी व्यंकट साईला दोषी मानलं. त्याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. व्यंकट साईने फक्त प्रेयसीला ठार केलं असं नाही तर हत्येचे पुरावेही नष्ट केले. पण पोलिसांनी त्याच्या सगळ्या कटाचा पर्दाफाश करुन त्याला अटक केली.